मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकल पालक विद्यार्थ्यांना छत्री वाटप….

सोलापूर
नगरसेविका श्वेता ताई खरात-खांडेकर यांच्या सामाजिक उपक्रमास महापौर विनायक कोंड्याल यांची उपस्थिती
सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नगरसेविका श्रीमती श्वेता ताई खरात-खांडेकर यांच्या वतीने सोनामाता आदर्श कन्या विद्यालय, सोनामाता आदर्श शिशु मंदिर आणि सोनामाता आदर्श बालक मंदिर येथे एकल पालक (Single Parent) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री विनायक दादा कोंड्याल यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना आवश्यक मदतीचा हात मिळावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. छत्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळाले.

यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी ताई देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजीताताई चाकोते, सभागृह नेते श्री नरेंद्रजी काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी ताई तडवळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. निर्मलाताई जंगम, नगरसेविका सौ. कल्पनाताई कदम, नगरसेविका श्रीमती श्वेता ताई खरात-खांडेकर, माजी नगरसेवक गुरुशांत दादा धुत्तरगावकर, मुख्याध्यापक जिलानी पटेल, सचिव कीर्तीलक्ष्मी अत्रे, सौ. गौरी आमडेकर तसेच सौ. सुजाता सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महापौर श्री विनायक दादा कोंड्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे असे समाजोपयोगी उपक्रम समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ करतात, असे सांगितले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधार, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
महापौरांनी नगरसेविका श्रीमती श्वेता ताई खरात-खांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे केलेले आयोजन कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनीही स्वागत करून त्याचे कौतुक केले.



