मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाची हत्या….
सोलापुरात राजकीय वादाला हिंसक वळण; भाजप कार्यालयाची तोडफोड...

सोलापूर, प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) यांची शुक्रवारी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबातील महिला या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार होत्या. मात्र पक्षाकडून ऐनवेळी उमेदवारी बदलण्यात आल्याने दोन दिवसांपासून दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता. अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला आणि त्यात बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ ‘क’ मध्ये भाजपच्या दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला होता. या प्रभागातून शालन शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजप नेते शंकर शिंदे यांच्याकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. याच कारणावरून शिंदे आणि सरवदे गटात वाद चिघळला.
वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे घटनास्थळी गेले होते. मात्र याचवेळी शिंदे गटातील काही लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने भाजप नेते शंकर शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती आहे. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, तसेच संबंधित भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
अशी मागणी त्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



