सासऱ्याच्या खुनाच्या प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला… जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत

सोलापूर, प्रतिनिधी
सासऱ्याच्या खुनाच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या मंगेश देविदास सलगर (वय २९, रा. कोळेगाव) यांच्या जामीन अर्जाला सोलापूरच्या अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत पी. राजवैद्य यांनी १२ डिसेंबर रोजी फेटाळला. फिर्यादी अभिषेक बापूराव मासाळ यांनी २७ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपीने घरासमोर झोपलेल्या पत्नीच्या कुटुंबीयांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सासरे बापूराव तुळशीराम मासाळ यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी आणि त्यांची आई (सासू) गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत उपचार घेत असताना फिर्यादीने मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी जामीन अर्जास तीव्र विरोध नोंदवला. आरोपीने सूडभावनेतून नियोजनबद्ध हल्ला केल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
आरोपीकडून ‘स्वसंरक्षणासाठी हल्ला केला’ असा दावा करण्यात आला असला, तरी न्यायालयाने तो ग्राह्य धरला नाही. सरकार पक्षाचे युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने यांनी काम पाहिले, तर तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी केला.



