india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

Blooming Meadows (Akshat Palms) सोसायटीला भेट; ड्रेनेज, रस्ते व स्ट्रीट लाईट समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश

नागरी प्रश्नांवर उपमहापौरांची थेट पाहणी

📍 सोलापूर (प्रतिनिधी)

 

शहरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी डोणगाव रोड परिसरातील Blooming Meadows (Akshat Palms) सोसायटी येथे सदिच्छा भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. ही भेट सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मनिष देशमुख यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती.
नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद, समस्यांची सखोल माहिती
भेटीदरम्यान उपमहापौरांनी सोसायटी परिसराची पाहणी करून नागरिकांकडून विविध समस्यांची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने पावसाळ्यात सांडपाणी साचते, दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, अशी तक्रार रहिवाशांनी केली. काही ठिकाणी ड्रेनेज लाईनची क्षमता अपुरी असल्याने संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्याची मागणीही करण्यात आली.

 

 

 

याशिवाय अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अपुऱ्या स्ट्रीट लाईटमुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. स्वच्छतेच्या बाबतीत नियमित कचरा उचल न होणे व काही ठिकाणी साचलेला कचरा यामुळे अस्वच्छता वाढत असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.

 

 

प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाहीचे आश्वासन
उपमहापौर देवकर यांनी सर्व तक्रारी काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित महानगरपालिका विभागांशी तात्काळ समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे सांगितले. ड्रेनेज प्रश्नासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांकडून पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल, तसेच रस्ते दुरुस्ती व स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

 

 

“नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. प्रत्येक प्रभागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे हे आमचे ध्येय आहे,” असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
सत्कार व समाधानाचे वातावरण
भेटीदरम्यान सोसायटीच्या वतीने उपमहापौरांचा वृक्ष, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे व कार्यपद्धतीचे कौतुक करत समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, भारतीय जनता पक्ष मंडल अध्यक्ष महेश देवकर तसेच स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौरांच्या या भेटीमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून लवकरच सर्व नागरी प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button