कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार प्रकरणी बँक अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर – ॲड.शशी कुलकर्णी….

सोलापूर
कर्जदाराच्या नावे कर्ज दाखवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक श्री.ए.एच .नाझरकर व बँकेचे तत्कालीन पंढरपूर शाखा व्यवस्थापक श्री.ए. डी. बेंद्रे दोघे रा. मंगळवेढा जि- सोलापूर या दोघांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार प्रसाद पवार यांनी तक्रार केली होती की, सन 2012 व 2013 मध्ये त्यांचे वडील व नातेवाईक यांच्या नावे बँकेने वीस – वीस लाख रुपयांचे दोन कर्ज प्रकरणी दर्शवून ती रक्कम बँकेच्या संचालकांच्या थकीत बाकी पोटी भरावी लागणार असल्याचे सांगून ते कर्ज भरण्याची जबाबदारी बँकेवर राहणार आहे.
असे सांगून रतनचंद शहा बँक पंढरपूर शाखा येथील शाखा व्यवस्थापक श्री.बेंद्रे,सरव्यवस्थापक ,श्री.नाझरकर व बँकेचे चेअरमन यांच्याविरुद्ध तक्रारदार श्री.पवार यांच्या सदर तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणांमध्ये वरील दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
दोन्ही अर्जदारांच्या अटकपूर्व जामीनास सरकारी वकील यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा देऊन तीव्र विरोध केला. तर सेवानिवृत्त दोन्ही अधिकारी यांच्या तर्फे ॲड. शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की, कर्ज प्रकरण हे कायदेशीर आहे, रक्कम वसुलीची प्रक्रिया सहकारी बँक कायदा कलम 101 नुसार व सरफेसी कायद्याप्रमाणे सुरू आहे, त्यावर फिर्यादी पक्षाला दाद मागण्याची कायदेशीर तरतूद असतानाही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून दाद नमागता केवळ वसुली थांबवण्याच्या दुष्ट हेतूने हा गुन्हा दाखल केला आहे, मूळ कर्जदारांनी कर्जबाबत कुठेही तक्रार केली नाही, दोन्ही अधिकारी अर्जदार हे सद्यस्थितीत सेवानिवृत्त आहेत,त्यामुळे त्यांच्या ताब्यात प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीत, सदर प्रकरणात पोलीस कोठडीतील तपासाची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद केला .
व अटकपूर्व जामीन मंजूर होण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून , तसेच अर्जदार तपास कामात सहकार्य करण्यास तयार आहेत, या गोष्टी विचारात घेऊन पोलीस स्टेशनच्या हजरीच्या अटीवर, दोन्ही अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.दोन्ही सेवानिवृत्त अधिकारी अर्जदार यांच्या वतीने ॲड.शशी कुलकर्णी,ॲड.ओंकार बुरकुल, ॲड .प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले.तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दत्तासिंह पवार यांनी काम पाहिले.
फौजदारी जामीन अर्ज क्र.1272/2025 व फौजदारी जामीन अर्ज क्र.1276/2025 .
कोर्ट – सोलापूर अती.सत्र न्यायाधिश श्री.पी.पी .राजवैद्य साहेब. ऑर्डर अपलोड तारीख.3/12/2025



