शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत जोरदार ‘बॅटिंग’
आयटी पार्क, उड्डाणपूल, बी टू जमिनी, डीपी रोड, गोतस्करी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर वेधले शासनाचे लक्ष...

सोलापूर : प्रतिनिधी
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी जोरदार ‘बॅटिंग’ केली. आयटी पार्क, उड्डाणपूल, बी टू जमिनी, डीपी रोड, गोतस्करी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत शासनाचे लक्ष वेधले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूरच्या विमानसेवेचा रखडलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोडविला गेला. विमानसेवेमुळे सोलापूर जगाच्या नकाशावर आल्यामुळे सोलापूरचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे. सोलापूरला आयटी पार्क मंजूर झाल्यामुळे सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार आहे.
सोलापुरातील अनेक चाळींवर चुकीच्या पद्धतीने बी टू लावण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या १००-१५० वर्षांपूर्वी तयार झालेल्या १४ मोठ्या चाळींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. या चाळींमधून १० हजार नागरिक राहतात. हजारो कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळे आणि याकरिता सरकारकडे कोणत्याही निधीची मागणी नसल्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली.
केंद्र सरकारच्या काही जागा ताब्यात न आल्यामुळे गेल्या १० वर्षांपूर्वी सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या २ उड्डाणपूलांच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. केंद्र सरकारच्या जागेचे भूसंपादन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर उड्डाणपूलांचे काम सुरू करावे, अशी मागणीही आमदार कोठे यांनी केली.
१९६६ साली सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अद्याप सोलापूरला मिळालेले नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले आहे. सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या ३४ एकर जागेचा आणि उपलब्ध इमारतींचा उपयोग करून २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरात सुरु व्हावे. क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकाच्या हद्दी मध्ये डीपी रोड, रिंग रोड करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याल्याच्या नियमाचा फटका सोलापूरला बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने डीपी रोड करण्यासाठी विशेष योजना आखावी आणि या माध्यमातून १२ मीटरपेक्षा जास्त मोठ्या रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. शासनातर्फे सोलापूरला मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिकल बस प्राधान्यक्रमाने सोलापूरला मिळाव्यात, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
गो तस्करांची गाडी स्क्रॅप करण्याची मागणी
सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होत आहे. ज्या गाडीतून गोतस्करी केल्याबद्दल संबंधित गाडीला दंड लावण्यात आला आहे, अशा गाडीतून पुन्हा एकदा गोतस्करी झाल्यास ती गाडी शासनाने स्क्रॅप करावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
——————–
चौकट १
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘इन्फ्रामॅन’
आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘इन्फ्रामॅन’ असा केला. शिक्षण, उद्योग, रोजगार आदी सर्वच क्षेत्रात राज्य सरकार चांगले काम करत आहे. अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीत पूर्वीच्या आमदारांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या औद्योगिक वसाहतीसाठी ५६ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी दिली आहे. सरकार राज्यभर करत असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी अभिनंदन करत आभार मानले.
————
चौकट २
कर्तव्यदक्षतेबद्दल मानले पालकमंत्र्यांचे आभार
सीना नदीला गेल्या ७० वर्षांमध्ये यंदा प्रथमच मोठा पूर आला. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे. त्याबद्दल सोलापूरकरांतर्फे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले.
————-
चौकट ३
रात्री १०.३० पर्यंत सभागृहात ठाण मांडून वेधले लक्ष
हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहराच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे हे शनिवारी रात्री १०.३० पर्यंत ठाण मांडून बसले होते. रात्री उशिरा आमदार देवेंद्र कोठे यांनी विविध मुद्दे मांडत सोलापूरकरांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.



