अनैतिक संबंधाच्या वादातून दुहेरी खून : नांदणी येथील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता:-ॲड. मिलिंद थोबडे…

सोलापूर
अनैतिक संबंधाच्या वादातून श्रीकांत अनिल नरुटे, वय :- २२ व अनिता चनबसप्पा सलगरे वय:- २९ दोघे रा- नांदणी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर यांना जीवे ठार मारल्या प्रकरणी
१) चनबसप्पा रेवप्पा सलगरे, २) नागप्पा उर्फ नागनाथ रामा माने, ३) उमेश सुरेश सलगरे, ४) कल्लाप्पा सिद्धाराम सलगरे, ५) लक्ष्मण चंद्रशा सलगरे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. मनोज शर्मा यांचे समोर होऊन त्यांनी पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, चनबसप्पा सलगरे व मयत श्रीकांत नरुटे यांची शेती एकमेकांजवळ होती व त्यांच्यात बोलणे चालणे होते त्यामुळे चनबसप्पा याची पत्नी व मयत श्रीकांत यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या चनबसप्पा यांस संशय होता. दिनांक 10/4/2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सलगरे वस्ती कडून शिवीगाळ व आरडाओरडाचा आवाज ऐकू आल्यामुळे अनिल नरुटे व त्याची पत्नी हे त्या ठिकाणी गेले असता, मयत श्रीकांत यांस खाली पाडून “तुला सोडणार नाही तुला खलास करतो” असे म्हणून शिवीगाळ करीत होता तसेच चनबसप्पा याची बायको तिला देखील मारहाण झाल्यामुळे ती विव्हळत खाली पडलेली होती.
त्यावेळी आरोपी उमेश सलगरे, लक्ष्मण सलगरे, कल्लाप्पा सलगरे, नागप्पा माने हे श्रीकांत व अनिता यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते, त्यावेळी श्रीकांत याचे वडील अनिल हे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना ढकलून दिले व त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केली त्यावेळी त्यांना चनबसप्पा सलगरे याने श्रीकांत याच्या डोकीत गळ्यावर व मानेवर कुऱ्हाडीने गंभीरवार करून जीवे ठार मारले, त्यानंतर त्याची पत्नी अनिता ही दरवाजासमोर पडली असताना तिच्या देखील गळ्यावर डोकीत कुऱ्हाडीने वार करून जिवे ठार मारले.
त्यानंतर चनबसप्पा व इतर आरोपी हे मोटरसायकलवर निघून गेले, उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय मंद्रूप येथे दोघांना घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केले, अशा आशयाची फिर्याद मयत श्रीकांत याचे वडील अनिल नरुटे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिले होते. सदर खटल्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकंदर ११ साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याचे सुनावणी वेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, दोन्ही नेत्र साक्षीदाराने दिलेल्या साक्षींचे अवलोकन केले असता, त्यांची साक्ष ही विश्वासार्ह नसल्याचे अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले, त्या पृष्ठयार्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले त्यावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. मनोज शर्मा यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे,ॲड. अभिजीत इटकर ,ॲड. डी. आय. कांबळे , अँड संजय कांबळे,ॲड फैयाज शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. ए. जी. कुर्डुकर यांनी काम पाहिले.



