अन्नभेसळ प्रकरणात बिग बझार व त्यांच्या अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता…

सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर येथील बिग बझार या नामांकित सुपरमार्केटविरोधात दाखल करण्यात आलेल्या अन्नभेसळ प्रकरणात न्यायालयाने बिग बझार व त्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले आहे. अन्नभेसळाचा आरोप न्यायालयात सिद्ध न झाल्याने हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. दिनांक २३ मार्च २०१५ रोजी सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी बिग बझार स्टोअरमधील तांदूळ, मुगदाळ तसेच मँगो ग्लोरी आंबा फ्लेवर शुगर कन्फेक्शनरी या अन्नपदार्थांचे नमुने घेतले होते. तपासणीदरम्यान या नमुन्यांमध्ये अनियमितता व भेसळ आढळल्याचा दावा करत अन्न सुरक्षा व मानके कायदा २०११ अंतर्गत बिग बझार व त्यांची पालक कंपनी फ्युचर ग्रुप तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तीन स्वतंत्र प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
या तिन्ही प्रकरणांची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात झाली. बिग बझारतर्फे ॲड. पंकज कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींची बाजू मांडली. न्यायालयात सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे अन्नभेसळाचा गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत, दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य न्याय दंडाधिकारी सुनील गावडे यांनी बिग बझार व त्यांच्या अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात बिग बझारतर्फे ॲड. पंकज कुलकर्णी, ॲड. जान्हवी कुलकर्णी आणि ॲड. स्वाती बताले यांनी काम पाहिले, तर अन्न सुरक्षा विभागातर्फे सरकारी वकिलांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निकालामुळे बिग बझार व त्यांच्या व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.



