“हमारे बच्चों के उपर झुठे केस करते क्या” असे म्हणून युवकावर सपासप वार करणाऱ्या आरोपी मुस्ताक पटेल ला जन्मठेपेची शिक्षा :- जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत…

सोलापूर
या खटल्याची सविस्तर हकीकत अशी की ,दि. 12/06/2020 रोजी, सकाळी 10.45 वाजताचे सुमारास, सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेलसमोर
आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकिल पटेल याचेबरोबर बाचाबाची करून, भांडणास सुरूवात केली. त्यावेळी मयत शकिल पटेल याने आरोपीस “हमारे बच्चों के उपर झुठे केस करते क्या” असे विचारता क्षणी आरोपी मुस्ताक पटेल याने त्याच्या कमरेजवळ असलेला चाकू काढून मयत शकिल पटेल याच्या छातीवर, पोटावर, हातावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून, त्याचा खून केला आणि सदर आरोपी मुस्ताक पटेल याने सदर गुन्हयात वापरलेला चाकू रस्त्याचे कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून सदर ठिकाणाहून पळून गेला. या घटनेबाबत मयत शकिल पटेल याचा मोठा भाउ अलिमोददीन पटेल याने दि. 12/06/2020 रोजी आरोपीविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने, पोलीसांनी आरोपीविरूध्द भारतीय दंड संहिता, कलम 302 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 135 अन्वये गुन्हा दाखल करून, या गुन्हयाच्या तपासास सुरूवात केली असता, सदर प्रकरणातील आरोपी हा स्वतहून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर झाला होता. त्यामुळे, संबंधीत पोलीसांनी त्यास अटक करून, सदर गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मा. न्यायालयामध्ये त्याचेविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब-3, सोलापूर यांच्याकडे सुरू झाली असता, सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वतीने बचावासाठी एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग एम. राजपूत यांनी असा युक्तीवाद केला की, सदर प्रकरणामध्ये तीन नेत्र साक्षीदार असून, त्यांनी सदरची घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे. तसेच या प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुरावा त्यामध्ये घटनास्थळावर पडलेले रक्ताचे डाग,
घटनास्थळाच्या जवळपास गुन्हयात वापरलेला चाकू शाबीत झालेला असून, त्याचेवरील रक्ताचे डाग तसेच आरोपी आणि मयताचे कपडयावरील रक्ताचे डाग या सर्व गोष्टीं प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले असता, त्याचा आलेला अहवाल हा गुन्हा शाबीत करण्यास पूरक असा असल्याने, तो पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असून, त्याला वैद्यकीय पुराव्याची देखील पुष्टी असल्याने, सदर मयताचा शवविच्छेदन अहवाल ज्यामध्ये मयताचे अंगावर एकूण 11 चाकूने भोसकल्याच्या जखमां दिसून आल्याने, तो पुरावा देखील नेत्र साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असा पुरावा असल्याने, सदरचा सर्व पुरावा हा आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकिल पटेल यास नई जिंदगी चौकात चाकूने भोसकून खून केल्याचे सिध्द होत आहे.

युक्तीवाद ग्राहय धरून, मे. न्यायालयाने आरोपी मुस्ताक पटेल यांस भारतीय दंड संहिता, कलम 302 अन्वये दोषी धरून, त्यांस जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम रु.5,000/- दंड तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 135 अन्वये 4 महिन्याचा कारावास आणि रक्कम रू.1,000/- दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.
या खटल्यात जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅङ श्री. यू.डी. जहागीरदार यांनी काम पाहिले. तसेच तपासी अंमलदार हेमंत शेंडगे आणि कोर्ट पैरवी म्हणून एस.एस. घाडगे यांनी काम पाहिले.



