बाळे खंडोबा मंदिरात अण्णा बनसोडे यांनी विजयाचा भंडारा उधळला : तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्याचा शनिवारी देवदर्शनाने समारोप !…

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे गुरुवारपासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. या तीन दिवसाच्या दौऱ्यात सोलापूर शहरातील मान्यवरांच्या भेटीगाठी, जाहीर सभा,आढावा बैठका, सदिच्छा भेटी, यासह व्यापारी आणि उद्योजकांना मार्गदर्शन आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी अण्णा बनसोडे यांनी सोलापुरातील श्री. सिद्धेश्वर महाराज मंदिर,शहाजहूरवली दर्गाह, श्री. मार्कंडेय मंदिर आणि त्यानंतर शेवटी बाळे येथील श्री खंडोबा मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि सोलापुरातून तिसऱ्या दिवसाच्या दौऱ्याचा समारोप करताना बाळे येथे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विजयाचा भंडारा उधळला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. अण्णा बनसोडे यांचा या भागाचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला.

तसेच खंडोबा मंदिराचा परिसर फिरून दाखवला.खंडोबा देवस्थानासाठी विकासासाठी येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा होऊन मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अण्णा बनसोडे यांनी यावेळी बोलताना दिली. सोलापुरात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या नेटक्या दौऱ्याचे नियोजन राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, प्रदेश चिटणीस आनंद-मुस्तारे, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, इरफान शेख, सुहास कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगदनकर चित्रा कदम नूतन गायकवाड प्रमोद भोसले, शाम गांगर्डे, वैभव गंगणे यांच्यासह सर्व टीमने यशस्वीरित्या केल्यामुळे तीन दिवसाचा दौरा शतप्रतिशत यशस्वी झाल्याबद्दल सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

नगरपरिषद आणि नगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सोलापुरात आपण जास्तीत जास्त वेळ ठाण मांडून महापालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.




