चेक न वटल्याप्रकरणी व्यापाऱ्यास तीन महिन्याची शिक्षा….

सोलापूर :- येथील व्यापारी अंबादास विठ्ठल कस्तुरी वय-५२ वर्षे, रा. विठ्ठल प्लॉट नं.२ राघवेंद्र नगर, सोलापूर यांस सोलापूर येथील ज्यु.मॅ. वर्ग साो व्ही.ए. कुलकर्णी यांनी फिर्यादी नरेंद्र सुदर्शन कोंपेल्ली वय-४२ वर्षे, रा.न्यु पाच्छा पेठ, सोलापूर यांस दिलेला चेक न वठल्याप्रकरणी ३ महिन्याची शिक्षा, तसेच नुकसान भरपाई म्हणून ९,५५,५००/- रुपये देण्याचा आदेश पारीत केला.
थोडकयात हकिकत अशी की, यातील फिर्यादी नरेंद्र कोंपेल्ली हे बेडशीट व टॉवेल उत्पादनाचा व्यवसाय करतात. आरोपी अंबादास कस्तुरी हे देखील व्यापारी असून ते फिर्यादी यांच्याकडून उधारीवर माल घेत होते . आरोपीने फिर्यादीकडून घेतलेल्या मालापोटी आरोपी हा फिर्यादीची रक्कम रुपये ६,१०,०००/- देणे लागत होता. सदरची रक्कम देण्यापोटी आरोपीने फिर्यादीस रक्कम रुपये ६,००,०००/- चा चेक दिलेला होता. सदरचा चेक न वठता परत आल्यामुळे फिर्यादीने अॅड. गुरुदत्त बोरगांवकर यांच्यामार्फत सोलापूर येथील ज्यु. मॅ. वर्ग साो येथे आरोपी विरुध्द दि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १३८ अन्वये खटला दाखल केला होता. सदर खटला प्रथमवर्ग न्यायाधिश व्ही.ए. कुलकर्णी साो यांचे कोर्टासमोर चालला सदर कामी फिर्यादीची साक्ष, दाखल केलेले कागदपत्रे तसेच फिर्यादीच्या वकिलांनी सादर केलेले सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे व केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मे. कोर्टाने आरोपीस तीन महिन्यांची शिक्षा तसेच फिर्यादीस रक्कम रुपये ९,५५,५००/- रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश पारीत केला.
सदरकामी फिर्यादीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगावकर, अॅड. देवदत्त बोरगावकर, अॅड. विश्वास शिंदे, तर आरोपीतर्फे अॅड. शांतवीर महेंद्रकर यांनी काम पाहिले.
एस.टी.सी. नं.४४४९/२०१८ कोर्ट व्ही.ए. कुलकर्णी साो.