शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसला खिंडार…देवेंद्र कोठे यांचा मास्टरस्ट्रोक
सोलापूर
काँग्रेसला सुरुंग लावत मोची समाजाच्या तब्बल ५ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश : माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची यशस्वी शिष्टाई
सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सुरुंग लागला आहे. शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येने आणि निर्णायक मतदान असलेल्या मोची समाजाच्या ५ नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
शहर मध्य मतदारसंघात एमआयएमचा धोका ओळखून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासारख्या कार्यतत्पर आणि सक्षम उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभारण्याच्या हेतूने मोची समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. याकामी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
जांबमुनी मोची समाजाचे शहर व जिल्हा अध्यक्ष तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सिद्राम अट्टेलुर, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने, बाबुराव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी मोची समाजाचे अनेक नेते प्रयत्नशील होते. काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. परंतु काँग्रेसकडून शब्द पाळण्यात न आल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती कटिबद्ध आहे. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहोत. मोची समाजाने पूर्ण क्षमतेने, मोठ्या प्रमाणावर प्रचार करून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.
—————
चौकट
भाजपची वाढली ताकद
शहर मध्य मतदारसंघात मोची समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना तीन वेळा निवडून आणण्यात मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा मोची समाजातील तब्बल ५ नगरसेवक आणि पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची ताकद शहर मध्य मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.