यशोधरा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेवर अश्लील वर्तन करणाऱ्या विशाल कांबळे विरोधात MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्याकडून कारवाईची मागणी; घटनेने शहरात खळबळ

सोलापूर :
हैदराबाद रोड येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेशी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विशाल कांबळे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ आणि ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, तिला झोप लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी विशाल कांबळे याने तिच्याजवळ जाऊन अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. ही बाब हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली.
संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ रुग्णालयातून काढून टाकावे तसेच त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुधीर बहिरवाडे यांनी केली. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशाल कांबळे (रा. फकुरुद्दीन झोपडपट्टी, लष्कर, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असताना, अशा प्रकारचे आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासातून काय निष्पन्न होते आणि रुग्णालय प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



