जेट अबॅकस स्टेट लेव्हल चॅम्पियन स्पर्धेत विराज मानेचा प्रथम क्रमांक…

सोलापूर
जेट अबॅकस आयोजित स्टेट लेव्हल चॅम्पियन स्पर्धेत सोलापूरच्या विराज सुधाकर माने याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
विराज सुधाकर माने हा लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर येथे इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असून, त्याने आपल्या बुद्धिमत्ता, वेगवान गणिती कौशल्य आणि अचूकतेच्या जोरावर या स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले.
या स्पर्धेत सोलापूरसह पंढरपूर, बारामती तसेच इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत विराजने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विराज हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने यांचा चिरंजीव असून, तो गणेश निर्मिती हाउसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर येथे राहतो. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे माने कुटुंबीयांसह शाळेचे शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून विराजचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विराजच्या या यशाने सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



