शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम

सोलापूर, दि. ५-
बाळीवेस शक्तिपूजा व समाजसेवा मंडळाच्यावतीने यंदा ११ ते २५ ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे प्रमुख आकर्षण असलेला ‘रावण वध’ हा हलता देखावा साकारण्यात येणार असून त्याचे उद्घाटन १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवी मंडप येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
११ रोजी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ९ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस येथून देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर घटस्थापना होईल. १२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मल्लिकार्जुन मंदिर येथे सिक्युअर हॉस्पिटल व लायन्स क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, बोन डेन्सिटी, ईसीजी व नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन, एक्स-रे व एमआरआय तपासणीसाठी २५ टक्के सवलत कूपनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता देवी मंडप येथे ‘रावण वध’ या हलत्या देखाव्याचे उद्घाटन होईल.
१३ रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम, तर १५ रोजी सायंकाळी ६ वाजता देवी मंडप येथे महिलांसाठी कुमकुम अर्चना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मल्लिकार्जुन मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता देवी मंडप येथे गंगाआरती होणार आहे.
१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य महाआरती तसेच महिलांचा नारीशक्ती सन्मान कार्यक्रम होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता सीमोल्लंघन कार्यक्रम, तर २५ ऑक्टोबर रोजी मल्लिकार्जुन मंदिर येथे पौर्णिमा पूजा व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचा नागरिकांनी आणि भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव अध्यक्ष प्रथमेश थोबडे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस जयप्रकाश आमनगी, उद्योजक अजित धुम्मा, निखिल थोबडे, उत्सव उपाध्यक्ष गणेश अक्कलकोटे, विजयकुमार वाले, शुभम तुकमाळी, इरेश डबरे आदी उपस्थित होते.



