पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर :
सोलापूरातील पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारण्यात येत असलेल्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
रविवारी नागपूर येथील ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.
यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मान केला.
पत्रकारांसाठी असलेली घरे सर्वसामान्य पत्रकारांना परवडणारी नाहीत. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन घरांच्या किमती कमी कराव्यात व परवडतील अशा पातळीवर आणाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपदादा मैत्र यांच्यासह राज्यातील विविध श्रमिक पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.



