crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आंतरराज्यीय सराईत मोटारसायकल चोरटा जेरबंद; सोलापूरसह धाराशिव, अहिल्यानगर व गुलबर्ग्यातील ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत

सोलापूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चौकशीत अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड

सोलापूर

सोलापूर तालुका पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका सराईत मोटारसायकल चोरट्याला जेरबंद करून त्याच्याकडून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर तसेच गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातून चोरी करण्यात आलेल्या एकूण ९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे विविध ठिकाणी घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. एक संशयित इसम मोटारसायकल घेऊन मुळेगाव तांडा परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

 

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३४, रा. पडसाळी, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असल्याचे सांगितले.
त्याच्याकडील मोटारसायकलबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 350 /2024 , बीएनएस कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत चोरीचा मोठा खुलासा
आरोपीला गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडीत त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करून चोरीच्या वाहनांचा शोध सुरू केला.

 

 

 

तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. या मोटारसायकली सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर तसेच गुलबर्गा (कर्नाटक) या विविध जिल्ह्यांमधून चोरी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
एकाच आरोपीकडून विविध जिल्ह्यांतील चोरीच्या दुचाकी हस्तगत झाल्याने या प्रकरणाला आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरोपीने आणखी कुठे मोटारसायकली चोरी केल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारवाईला यश
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला तातडीने ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीमुळे चोरीच्या वाहनांचा मोठा तपशील समोर आला. ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत झाल्याने संबंधित चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यास पोलिसांना महत्त्वाची मदत झाली आहे.
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज गायकवाड हे करीत आहेत.

 

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक कुंदन गवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांडेजकर, पोलीस हवालदार धनराज गायकवाड, राहुल महिंद्रकर, नागेश वाघमोडे, शशिकांत काळेकर, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पेंढार नदाफ, फिरोज बारगीर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकात झालेल्या मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा तपास लागण्याची शक्यता असून, पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button