india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

बेजबाबदार लोकांना पोसण्यासाठी महापालिका चालवायची आहे का ?

शहर स्वच्छतेत निष्काळजीपणा झाल्याने आमदार देवेंद्र कोठे प्रचंड संतप्त : स्वच्छतेच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

 

सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, सर्वसामान्य नागरिकांची वस्ती असलेला परिसर इतकेच नव्हे तर चक्क जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या समोर देखील मातीचे थर, गवत अशी अस्वच्छता आहे. शहरात इतकी मोठी अस्वच्छता असताना बेजबाबदार मक्तेदार, कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी महापालिका आपल्याला चालवायची आहे का ? असा संतप्त सवाल करीत आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री १.३० वाजता महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत नगरसेवक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समवेत शहरात विविध ठिकाणी फिरून स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.

 

 

 

रस्ते स्वच्छता करणारी पाच अत्याधुनिक यंत्रे, दोन टँकर, दोन ट्रॅक्टर, माती काढण्यासाठी बिगारी अशी यंत्रणा असूनही शहरात सर्वत्र अस्वच्छता, धूळ दिसून येत आहे. अशातच संबंधित टँकरच्या चालकाने रस्ते आणि फुटपाथ स्वच्छतेसाठी एक महिन्यापासून टँकर येत असल्याची चुकीची माहिती दिली. नागरिकांशी संवाद साधल्यावर मात्र या माहितीत तथ्य नसून तीन दिवसांपासून येत असल्याचे आढळले. तसेच फुटपाथच्या दोन्ही बाजू आणि डिव्हायडरच्या दोन बाजू अशा चार बाजू स्वच्छतेसाठी दिलेल्या असताना दोनच बाजू स्वच्छ करत असल्याचे दिसून आले. अनेक फूटपाथवर गुडघ्या इतके गवत, चिलारी वाढल्याचेही आढळले. हे पाहून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

 

 

 

 

नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी शहरात रात्री अचानक भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी स्वच्छतेबाबत प्रचंड निष्काळजीपणा झाल्याचे दिसून आले होते. नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी याबाबतची तक्रार आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करताच आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतः पाहणी केली. शहरात वाढलेली अस्वच्छता दिसून येताच आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत बिराजदार यांना रात्री १.३० वाजता फोन लावला. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ” फूटपाथ डीव्हायडरच्या आजूबाजूस सहा इंच, एक फुटांचे मातीचे थर आहेत. स्वच्छतेचे कोणते मार्ग असावेत यावर नियंत्रण नाही. त्यांचे वरिष्ठ जागेवर दिसत नाहीत. संबंधित मुकादमला याची जाणीव नाही का ? ही कामे करून घेता येत नाहीत का ? १५ दिवसांत शहरातील स्वच्छता झाली पाहिजे. कोणालाही पोसू नका. जे काम करत नाहीत त्यांना कारवाईच्या नोटिसा काढा. रात्री पहाटे अचानक स्वच्छतेची पाहणी करा.” यावर महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आणि यंत्रणा त्वरित कामाला लागली.

 

 

 

यावेळी नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेविका राजश्री धोडमणी, शशिकांत भोसले, ऍड. श्रवण साबळे, मनोज पिसके आदी उपस्थित होते.
———–

चौकट

स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही

नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी सरकार धडपड करत असताना शहर स्वच्छ करणाऱ्या नागरिकांनीही याचे आत्मचिंतन केले पाहिजे. लहान मुले, माता-भगिनी, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेल्या सार्वजनिक ठिकाणी मावा खाऊन थुंकणे चुकीचे आहे. होम मैदान शेजारी असलेल्या स्ट्रीट बाजार येथे अशी अस्वच्छता दिसून आली आहे. इथे आणि अन्यत्र थुंकणाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना कचरा रस्त्यावर कचराकुंडीत न टाकता घंटागाडीतच टाकावा. घंटागाडी येत नसेल तर नगरसेवक, भाजपा पदाधिकारी किंवा संपर्क कार्यालयात नागरिकांनी संपर्क करावा. घंटागाडी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनासोबत नागरिक म्हणून आपलीही आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
————

कोट

स्वच्छ, सुंदर आणि धूळमुक्त सोलापूर हे ध्येय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोलापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि धूळमुक्त झाले पाहिजे अशा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना आहेत. शहरातील स्वच्छतेच्या कामाची मध्यरात्री अचानक पाहणी केली. परंतु महापालिका प्रशासन शहर स्वच्छतेच्या बाबतीत कमी पडल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहर स्वच्छतेच्या कामाचा मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. यासाठी नाईट रायडर्स आणि अर्ली बर्ड्स अशा दोन टीम बनवण्यात आल्या आहेत. पुढील १५ दिवस शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय, स्वच्छता करणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा लावली नसल्याचे दिसून आल्याने ती यंत्रणा कार्यान्वयीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button