सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार ! प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन…

सोलापूर : प्रतिनिधी
उद्योगाच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी २४ तास पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकचा आर्थिक भार न देता सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी सोलापूरकरांना दिले.
थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी श्री. परदेशी गुरुवारी सोलापुरात होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, कार्यक्रमाच्या संयोजिका नलिनी चंदेले आदी मान्यवर होते.
परदेशी म्हणाले, सोलापुरात अनेक विकास कामे झाली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विजयपूर, हैदराबाद या मोठ्या शहरांना जोडणारे रस्ते तयार झाले. परंतु पाणी नसल्याने सोलापूरच्या विकासाला खो बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर विकासाची तळमळ असलेले आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते आणि पदाधिकाऱ्यांनी पाणी प्रश्न सोडवण्याबाबत पुढाकार घेतला. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सोलापूर महानगरपालिकेचे कमी उत्पन्न लक्षात घेता नागरिकांना या योजनेचा आर्थिक भार होऊ नये याकरिता जागतिक बँकेला संपर्क साधून ही योजना राबविण्याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे जागतिक बँकेच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १० वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलावर होणारा प्रचंड मोठा आर्थिक खर्च लक्षात घेऊन नव्याने होणारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. या सौरऊर्जेसाठी लागणारे बॅटरी स्टोरेजचाही खर्च जागतिक बँकेच्या माध्यमातून होणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत ही योजना कार्यान्वयित होईल. सोलापुरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचेही काम वेगाने होणार असून पुढील दीड ते दोन वर्षात हे काम होईल, असेही प्रविणसिंह परदेशी यांनी याप्रसंगी सांगताच सोलापूरकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
—————
चौकट १
आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे झाले जागांचे हस्तांतरण
आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केल्यामुळे राज्य शासन आणि विशेषतः केंद्र शासनाच्या जागा मिळवण्याचे तुलनेने अवघड असलेले काम सोपे झाले, असे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी भाषणात सांगितले.
———-
चौकट २
फेटा न बांधण्याच्या प्रतिज्ञेचे केले कौतुक
सोलापूर शहराला दररोज २४ तास पाणी दिल्याशिवाय फेटा बांधून न घेण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रतिज्ञेचेही प्रविणसिंह परदेशी यांनी कौतुक केले.



