india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

रूपाभवानी मंदिर परिसराची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून पाहणी

नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनात अडथळा येणार नाही; आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाला सूचना

 

सोलापूर, दि.

 

२ ऑक्टोबर २०२६ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आज रूपाभवानी मंदिर परिसराची पाहणी केली. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

 

 

 

 

महापौर विनायक कोंड्याल यांच्या पाहणी दौऱ्यात उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक गौतम कसबे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सायक आयुक्त युवराज गाडेकर नगर अभियंता नीलकंठ मतपती विभागीय अधिकारी श्री बक्षी मंदिराचे पुजारी मल्लिनाथ मसरे, राजू पवार तसेच रूपाभवानी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष व ट्रस्टी उपस्थित होते.

 

 

 

नवरात्रोत्सवाच्या काळात रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील उपलब्ध जागा, भाविकांच्या ये-जा करण्याचा मार्ग, दर्शनरांग तसेच गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. भाविकांना मंदिरात सुलभपणे प्रवेश करता यावा तसेच दर्शनानंतर सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

परिसरातील स्वच्छता व्यवस्था प्रभावी ठेवण्यासोबतच उत्सव काळात नियमित साफसफाई, कचरा संकलन आणि आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही पाहणी करण्यात आली.

 

 

 

यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, “नवरात्रोत्सव हा शहरातील नागरिकांसाठी तसेच देवीच्या भाविकांसाठी श्रद्धेचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. उत्सवाच्या कालावधीत रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि निर्विघ्न दर्शन मिळावे, यास प्रशासनाचे प्राधान्य राहील.”

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि इतर नागरी सुविधांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. उत्सव काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

 

 

 

रूपाभवानी मंदिर प्रशासन व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशीही महापौरांनी चर्चा करून उत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची माहिती घेतली. महानगरपालिका प्रशासन, मंदिर प्रशासन आणि उत्सव समिती यांच्या समन्वयातून नवरात्रोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button