सरप्राईज भेट देत भाजप पदाधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र कोठे यांचा सुखद धक्का

सोलापूर, दि. २९ सप्टेंबर २०२६ :
निवडणुका नसतानाही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या भागातील समस्या आणि विकासकामांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत मंगळवारी भाजप पदाधिकारी राजू पडाल यांच्या निवासस्थानी अनपेक्षितपणे सदिच्छा भेट दिली.
सन १९९७ पासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असलेले राजू पडाल हे पक्षाचे सक्रिय पदाधिकारी असून, सन १९९९ पासून आपल्या भागातील बूथची जबाबदारी ते सातत्याने सांभाळत आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने पडाल यांना सुखद धक्का बसला.

या भेटीदरम्यान आमदार कोठे यांनी त्यांच्या बूथसह परिसरातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध विषयांवर राजू पडाल यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संवाद साधला.
निवडणुका जवळ आल्यावरच नव्हे, तर वर्षभर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने आमदार देवेंद्र कोठे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
आमदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या घरी भेट दिल्याने आपल्याला विशेष आनंद झाला असून, “पक्षाचा आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी स्वतःहून येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतो, ही कार्यकर्त्यांसाठी निश्चितच सुखद आणि प्रेरणादायी बाब आहे,” अशी भावना राजू पडाल यांनी यावेळी व्यक्त केली.
राजू पडाल यांनी सुचविलेल्या विविध समस्या व विकासकामांच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिले.



