खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता:-ॲड. रितेश थोबडे

सोलापूर
:- हौसाबाई महादेव मल्लाव हिस जीवे ठार मारल्या प्रकरणी साखराबाई शिवाजी मल्लाव व तिची मुलगी अनिता विजय भोई रा. तिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी रद्दबातल करून दोघींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, मयत हौसाबाई व आरोपी साखराबाई या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या व ते तिऱ्हे येथे एकमेकांच्या शेजारी राहत होते. साखराबाई हिचे पतीसोबत मयत हौसाबाई हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. दिनांक-12/12/2020 रोजी मयत हौसाबाई ही तिच्या घरात एकटीच झोपली होती. त्यावेळी दरवाजावर काहीतरी आवाज आला म्हणून तिने दरवाजा उघडला त्यावेळी आरोपी साखराबाई, तिची मुलगी अनिता व इतर लोक हे घरात घुसले. त्यावेळी साखराबाई हिने चाकूने वार केला त्यावर हौसाबाई हिने आरडाओरडा केला असता त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी आरोपी अनिता हीने त्या लोकांना शिवीगाळ केली त्यावर ते लोक तिथून निघून गेले. त्यावेळी अनिता व साखराबाई हिने आतून दरवाजा बंद करून मयत हौसाबाई हिचेवर चाकूने वार केला व तेथून पळून गेले. त्यानंतर गावातील लोकांनी व तिच्या मुलाने तिस उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, तिने वरील आशयाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला होता. त्यानंतर 6/1/2021 रोजी हौसाबाई उपचारादरम्यान मयत झाली.
पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे चालला होता. सदर खटल्यात न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची व दंडाची शिक्षा ठोठावली होती.
सदर शिक्षेविरुद्ध दोन्ही आरोपींनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
अपिलाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात मयताचा मृत्यूपूर्व जबाब पाहिले असता, तो ऐच्छिक मृत्यूपूर्व जबाब दिसून येत नाही.
तसेच साक्षीदारांचा कोर्टासमोर आलेला पुरावा पाहिला असता मयत ही जबाब देतेवेळी शुद्धीवर असल्याचे दिसून येत नाही, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी दोन्ही मायलेकींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस एच यादव यांनी काम पाहिले.



