आचारसंहितेत AIMIMच्या कार्यक्रमांवर आक्षेप; चौकशीची मागणी

शिलाई मशीन, धान्य वाटप व ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सोलापूर :
विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना AIMIMच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये शिलाई मशीन व धान्य वाटप तसेच ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ कार्यक्रमाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अजय मैदर्गीकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. आचारसंहिता लागू असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, कार्यक्रमांचा खर्च कोणत्या माध्यमातून करण्यात आला, लाभार्थी कशा पद्धतीने निवडण्यात आले आणि या कार्यक्रमांचा निवडणूक प्रचाराशी काही संबंध होता का, याची पडताळणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, काही कार्यक्रमांच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे छायाचित्र असलेले बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची निवडणूक विभागाने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः निवडणुकीच्या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारे वस्तूंचे वाटप, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन किंवा राजकीय व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असल्यास त्याची निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमांसाठी कोणती परवानगी घेण्यात आली होती, कार्यक्रमाचा आयोजक कोण होता, निधीचा स्रोत काय होता, किती लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले आणि त्यासाठी झालेला एकूण खर्च किती होता, यासह कार्यक्रमांचे व्हिडिओ, फोटो, बॅनर-फ्लेक्स आणि इतर उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू असताना राजकीय पक्षांशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी देताना निवडणूक प्रशासनाकडून कोणते निकष वापरले जात आहेत? तसेच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही करण्यात येते, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून संबंधित कार्यक्रमांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, हे स्पष्ट करावे. उल्लंघन आढळल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी अजय मैदर्गीकर यांनी केली आहे.



