शहर गुन्हे शाखेकडून जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांत उघड

सोलापूर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जबरी चोरी, मोटारसायकल चोरी व इतर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना शहर गुन्हे शाखेच्या पथकाला जबरी चोरीच्या गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. सोलापूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाउंडच्या भिंतीलगत मार्केट चौकी ते हरेभाई प्रशालाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या MH-13-DF-5334 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे (१) मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय ३६, व्यवसाय ड्रायव्हर) आणि (२) नागेश मल्लिनाथ बळते (वय १८ वर्षे २० दिवस) अशी असल्याचे समोर आले.
चौकशीत दोघांनी सोलापूर शहरातील दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्स यांच्या दुकानाजवळून पायी जाणाऱ्या एका इसमाचा पाठलाग करून त्याला दमदाटी केली. त्याच्याकडील रोख १ लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली, अशी माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील रोख १ लाख रुपये तसेच गुन्हा करताना वापरलेली रोख रक्कम व मोटारसायकलसह एकूण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 708/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे व शंकर याळगी यांनी यशस्वीपणे पार पाडली…



