india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ

सोमवारी महारथोत्सव : भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

सोलापूर : प्रतिनिधी

जगदगुरु श्री मन्ममध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्ष होणारा श्री राघवेंद्रस्वामी आराधना महोत्सव यंदा शनिवार (दि. २९) ते सोमवार (दि. ३१) पर्यंत होणार आहे. त्यानिमित्त मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात आणि श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील श्री राघवेंद्र स्वामी मठात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

सोलापुरात होणाऱ्या आराधना महोत्सवाचे यंदाचे ५२ वे वर्ष आहे. मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये हा आराधना महोत्सव होत आहे.

 

 

 

आराधना महोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ६.३० वाजता गोपूजा, ध्वजारोहण, धान्यपूजा, लक्ष्मीपूजा व प्रार्थनोत्सव, स्वस्तिवाचन व महामंगळारती हे धार्मिक विधी होणार आहेत. शनिवारी (दि.२९) रोजी पूर्वाराधना तर रविवारी (दि. ३०) रोजी मध्याराधना होणार आहे. या दोन्ही दिवशी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी १२ वाजता तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थ प्रसाद होणार आहे. तसेच रात्री ८ वाजता पालखी सेवा, रथोत्सव, स्वस्तिवाचन महामंगलारती व श्रेय प्रार्थना होणार आहे. तसेच रविवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता मध्याराधना प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात येणार आहे.

 

सोमवारी श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाचा समारोप होणार असून या दिवशी उत्तराराधना करण्यात येणार आहे. यात पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी ११ वाजता तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थप्रसाद हे कार्यक्रम होणार आहेत. तसेच सोमवारी सकाळी ११ वाजता श्री राघवेंद्र नगरातून महारथोत्सव होणार आहे. श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठात सोमवारी पालखीसेवा देखील होणार आहे.

 

 

 

मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात शनिवार ते सोमवारपर्यंत दररोज सकाळी प्रवचन आणि भजन होणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता अंबिका कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा गुरुवंदना हा भरतनाट्यमचा कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवारी (दि.२९) सायंकाळी ६.३० वाजता गीता हेगडे आणि सहकाऱ्यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी (दि.३०) सायंकाळी ६.३० वाजता प्रशांत देशपांडे आणि सहकाऱ्यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील मठात शनिवारी (दि. २९) सायंकाळी ६ वाजता वैशाली कोथळीकर आणि संतोष कोथळीकर यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजता सार्थक बाविकर यांचा कन्नड व मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button