सोलापूर हादरले! सुनीलनगरातील एस.पी. एंटरप्रायझेसला भीषण आग; सहा अग्निशमन बंब घटनास्थळी..
अरुण स्कूलजवळ आगीचे तांडव; महापौर विनायक कोंड्याल यांची घटनास्थळी

सोलापूर
सुनील नगर जवळली गणेशनगर परिसरातील अरुण स्कूलजवळ असलेल्या एस.पी. एंटरप्रायझेस या आस्थापनाला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्याकडून आगीची सद्यस्थिती, आग नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही तसेच उपलब्ध अग्निशमन यंत्रणेबाबत माहिती घेतली. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तातडीने कार्यरत ठेवण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

एस.पी. एंटरप्रायझेसचे मालक पिरजादे यांच्या आस्थापनात लागलेली आग प्रामुख्याने ज्यूटच्या गोण्या, कापसाचा कचरा, यंत्रसामग्री व इतर साहित्यापर्यंत मर्यादित असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यूटच्या गोण्या व कापसाच्या कचऱ्यामुळे आगीने वेगाने पेट घेतल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या एकूण सहा अग्निशमन बंबांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. तसेच पाण्याचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी खासगी पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम करीत आहेत.

सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता अग्निशमन दलाच्या कार्यवाहीस सहकार्य करावे आणि घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



