राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न मांडले
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले रिपोर्ट कार्ड सादर

लक्षवेधक:-सोलापूरची लेक म्हणून संसदेत सोलापूरच्या विषयांवर भाष्य
लक्षवेधक:-नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य प्रश्नांकडे लक्ष वेधले
लक्षवेधक:-पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई’
सोलापूर : राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती नोंदवत सहा विधेयकांवर भाष्य आणि ३४ प्रश्न मांडून सोलापूरची लेक म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली.नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडले. पहिल्याच अधिवेशनात सहा विधेयकांवर बोलण्याची संधी मिळाली. यामध्ये वंदे मातरम्, जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, बँकर्स बुक्स एव्हिडन्स, केरळ अल्टरशन ऑफ नेम आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विधेयकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगासह सोलापुरी चादर, विमानतळाचे नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल आदी प्रश्न संसदेत मांडल्याचे त्यांनी नमूद केले. २२ दिवसांच्या अधिवेशनात सुमारे १५० प्रश्न विचारले मात्र बॅलेट प्रक्रियेतून ३४ प्रश्न निवडले गेले. यामध्ये सहा तारांकित प्रश्नांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सोलापुरी चादरीचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक हा सोलापूरची लेक म्हणून अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा घेतला. महिलांना तातडीने वैद्यकीय व पोलिस मदत मिळावी तसेच मातृवंदना योजनेतील आर्थिक मदत वाढवावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.
सोलापूरची लेक म्हणून तो
माझ्यासाठी गौरवाचा क्षण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन वेळा भेटता आलं. पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यांच्यासमवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदी यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की ‘ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई’. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं, हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता.
एनडीएच्या काळात इन्साफ मिळेल
रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स अमेंडमेंट बिल’ यामध्ये डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे तिथे आग्रहाने बोलले.’द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल’ हे तिसरं बिल होतं ज्याच्यावरती माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळे आता मोदी यांच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली असल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले.
वार्तालापातील ठळक मुद्दे –
– राज्यसभेत १०० टक्के उपस्थिती दर्शवली
– पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न आणि सहा विधेयकांवर भाष्य.
– सोलापुरी चादर, टेक्स्टाईल उद्योग, विमानतळाचे नाईट लँडिंग आणि रेल्वे सुविधांचे प्रश्न संसदेत मांडले.
– शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि गरीबांच्या घरकुलासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर भेट, चादरीचे कौतुक हा अभिमानाचा क्षण
-‘सोलापूरची लेक’ म्हणून संसदेत मांडलेल्या कामाचा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सादर केले रिपोर्ट कार्ड.
—-



