जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सोलापूर : श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभागप्रमुख विभावरी रणदिवे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष नागरसे, राजेश मोहोळकर व सचिन मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी राष्ट्रीय प्रतिज्ञेचे वाचन केले. प्रणिल माणिकशेटे यांनी संविधान वाचन, सागर शहा यांनी ‘असाक्षरमुक्त गाव’ प्रतिज्ञा, तर तृप्ती दुर्गे यांनी ‘व्यसनमुक्त विद्यार्थी’ प्रतिज्ञेचे वाचन केले. त्यानंतर पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “तंत्रज्ञानाच्या युगात देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला शंभर टक्के साक्षर करण्याबरोबरच स्वच्छ, सुंदर आणि निर्व्यसनी भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.”

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सरस्वती गाईड पथकातील विद्यार्थिनींनी शानदार संचलन केले. संचलनाचे नेतृत्व अन्विता बाबरे, शरण्या शिंदे व औदुंबरी पोतदार यांनी केले. त्यांना गाईड कॅप्टन तृप्ती माणिकशेटे व स्काऊटर प्रसन्न काटकर यांनी मार्गदर्शन केले.
क्रीडा विभागप्रमुख संजय पंडित व क्रीडाशिक्षक सुभाष उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर विविध कवायतींचे शानदार सादरीकरण केले. तसेच भार्गवी बोडा, दीप्ती हावळे, यशश्री हलकुडे, संध्या सिरसट, रिया शिंदे, वैष्णवी शिंदे, संध्या मदुरे व साक्षी भागवत या विद्यार्थिनींनी तृप्ती दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहनृत्य सादर केले. त्यांना विद्यार्थी शिक्षिका शीतल स्वामी यांनी सहकार्य केले.
प्राथमिक विभागातील सम्राट सुरवसे व पायल कोराडे, तसेच प्रशाला विभागातील शिवण्या स्वामी, विवान वांढरे व समृद्धी वाडकर यांनी खुमासदार शैलीत देशभक्तीपर भाषणे केली. वैभवी वांढरे हिने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी प्रशालेतील राष्ट्रपती गाईड पुरस्कारप्राप्त काजल करपेकर तसेच राज्यपाल गाईड पुरस्कारप्राप्त कांची हजारे, अनुष्का पाटील, अदिती पाटील, नम्रता मोहिते, काव्या पाटील व भूमी शहा या गाईड विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी केले, तर विकास शिळ्ळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘देशभक्ती, शिस्त, साक्षरता आणि व्यसनमुक्तीचा संकल्प’ या संदेशाने स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.



