भाजपाची शब्दपूर्ती, सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती; बी-२ प्रश्नावर राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय – आमदार देवेंद्र कोठे

सोलापूर, दि. 20 :
सोलापूर शहरातील सुमारे शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बी-२ जमिनीच्या प्रश्नावर राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न मार्गी लागल्याने हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे (जीआर) या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे, अशी माहिती शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले की, बी-२ जमिनीचा प्रश्न हा सोलापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गुंतागुंतीचा विषय होता. अनेक दशकांपासून विविध सरकारांकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, कोणत्याही सरकारला हा प्रश्न निकाली काढता आला नव्हता.
भाजपने सोलापूरकरांना दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण केला असून, हा निर्णय म्हणजे सोलापूरच्या विकासाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांकडून आकारण्यात येणारा दर. शासनाने १९८९ च्या रेडीरेकनरनुसार दर निश्चित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागेचा ताबा मिळवण्यासाठी नागरिकांना अत्यंत नाममात्र रक्कम भरावी लागणार आहे. आजच्या बाजारभावाच्या तुलनेत हा दर अत्यल्प असल्याने प्रत्येक कुटुंबाचे लाखो रुपये वाचणार आहेत. परिणामी, सोलापूरकरांची एकूण कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून आर्थिकदृष्ट्याही हा निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
बी-२ क्षेत्रातील अनेक चाळी व जुन्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क नसल्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले होते. आता शासनाच्या या निर्णयामुळे मालकी हक्काचा मार्ग मोकळा होणार असून चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळेल. त्यामुळे सुरक्षित, आधुनिक आणि मूलभूत सुविधांनी युक्त घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार असल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले.
हा निर्णय केवळ जमिनीच्या मालकीपुरता मर्यादित नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. मालकी हक्क मिळाल्यानंतर नागरिकांना बँक कर्ज, बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, वारसा हक्क तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीलाही चालना मिळेल.
नागरिकांना शासन कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असून ‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व आवश्यक सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे अर्ज, कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बी-२ प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष पाठपुरावा केला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, असे आमदार कोठे यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे वर्षानुवर्षे आपल्या मालकी हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून, विकसित सोलापूरच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार देवेंद्र कोठे यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.



