सांगोला तालुक्यात ३ देशी पिस्टलसह चौघे जेरबंद; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

सोलापूर
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत सांगोला तालुक्यातील चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ३ देशी बनावटीची पिस्टले, ६ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध शस्त्रांच्या बेकायदेशीर व्यवहारावर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विशेष पथकांना सूचना देत जिल्हाभर शोधमोहीम सुरू केली.

याच दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला–मिरज महामार्गावरील हातीद गावाजवळील पुलाखाली तीन संशयित इसम पिस्टलसह उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता अवधूत सुभाष केंगार (रा. कोळा), हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (रा. किडेभीसरी) आणि आबा धोंडीराम नरळे (रा. जुनोनी, ता. सांगोला) यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टले, चार जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पिस्टल बाळगण्याचा परवाना विचारला असता आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी ही पिस्टले दोन वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील मेहबूब नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पोलीस कोठडीत सुरू असलेल्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आणखी एक आरोपी दिलीप शिवाजी अलदर (रा. मदने वस्ती, कोळे, ता. सांगोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईत ३ देशी बनावटीची पिस्टले, ६ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर सांगोला पोलिस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील
सलीम बागवान दशरथ मोरे अजय घाडगे रवी माने वीरेश कलशेट्टी वेंकटेश मोरे दिपाली जाधव पल्लवी इंगळे अश्विनी गोटे सुनंदा झळके जगदीश राठोड आता सुरज रामगुडे मनोज राठोड शिवलिंग स्वामी सुनील पवार अशितोष जाधव कोष्टी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
अवैध शस्त्रांविरोधातील ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेचे आणखी एक उदाहरण ठरली असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



