maharashtrapoliticalsocialsolapur

जीर्ण देवतांच्या मूर्ती-फोटोंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी हिंदवी सेनेचा अनोखा उपक्रम

गणपती घाट येथे ठेवला विशेष लोखंडी बॉक्स, नागरिकांना सहकार्याचे सुधीर बहिरवाडे यांनी केले आवाहन

 

सोलापूर | प्रतिनिधी

 

श्री सिद्धेश्वर मंदिर, गणपती घाट तसेच शहरातील विविध मंदिर परिसरात अनेक नागरिकांकडून जीर्ण झालेले देवी-देवतांचे फोटो, भग्न मूर्ती आणि धार्मिक साहित्य ठेवले जात असल्याने त्यांची विटंबना होत असल्याची बाब लक्षात घेऊन हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने एक अनोखा धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

 

 

दत्त चौक येथील गणपती घाट, गणेश कुंडाजवळ विशेष लोखंडी बॉक्स ठेवण्यात आला असून, नागरिकांनी जीर्ण झालेले देवी-देवतांचे फोटो, भग्न मूर्ती तसेच इतर धार्मिक साहित्य या बॉक्समध्ये जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जमा होणाऱ्या सर्व मूर्ती व फोटोंचे हिंदू धर्मपरंपरे नुसार विधिवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिली.

यावेळी मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दास शेळके यांनीही सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना, फाटलेले धार्मिक फोटो किंवा भग्न मूर्ती मंदिर परिसरात अथवा सार्वजनिक ठिकाणी न ठेवता गणपती घाट येथील हिंदवी सेनेच्या विशेष बॉक्समध्ये जमा करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे सांगितले.

 

 

 

 

या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक भावना जपण्याबरोबरच मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि देवी-देवतांच्या प्रतिमांचा सन्मान राखण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी हिंदवी सेनेचे देविदास मेटकरी, प्रशांत पवार, लतेश हिरवे, पुजारी चैतन्य शिरशीकर, सुमित लांडगे, विनायक पाटील, योगेश कणके, अविनाश हजारे, संतोष चव्हाण यांच्यासह महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button