एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन
शहर मध्य मतदारसंघात नागरिकांच्या भेटी घेऊन केली जनजागृती : नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकांनी अर्ज भरावेत असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आलेल्या शासकीय सुट्टीच्या दिवशी रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये नागरिकांची संवाद साधत जनजागृती केली.
नागरिकांच्या भेटीप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, एसआरआय मोहिमेमध्ये शासनाचे मतदार केंद्रस्तर अधिकारी प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून दुबार नावे वगळणार आहेत. तसेच नवीन नावे यादीत समाविष्ट करणार आहेत. अनेक नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी नोकरीसाठी कायमचे राहायला जातात. त्यामुळे काही वेळा मतदारयादीत चुकीची नावे तशीच राहतात. किंवा स्थानिक मतदार यादीत नाव समाविष्ट न केल्यामुळे अशा नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागते. एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर येणे, नावे वगळली जाणे, व्याकरणातील चुका, दिनांकामधील चुका, मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत तशीच राहणे यामुळे मतदारयादीमध्ये अनेक चुका आढळून येत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी मतदारयादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाचे जबाबदार कार्यकर्तेही यात सहभागी होणार आहेत. एस आय आर मोहिमेतील अर्ज भरल्यानंतरच नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. जे मतदार नियमितपणे मतदान करतात त्यांचेदेखील नाव अंतिम मतदार यादीत येण्यासाठी हा अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी एसआयआरचा अर्ज भरावा आणि स्वतःचे आणि कुटुंबातील सर्वांची नावे मतदार यादीत येण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले.यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील १२ बुथवर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहर मध्य विधानसभेचे एसआयआर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेविका राजश्री दोडमनी, ऍड. शैलेश पोटफोडे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, गोपाळ मिस्किन, मनोज पिसके, विजय महिंद्रकर, विश्वनाथ प्याटी, आदी उपस्थित होते.
——–
चौकट
एसआरआयसोबतच विकासकामांबाबत नागरिकांशी चर्चा पाहणी आणि सूचनाही
एसआरआय जनजागृतीपर भेटी दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कामांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखभाल दुरुस्ती बाबतच्या सूचना दिल्या. तसेच नव्याने कराव्या लागणाऱ्या कामांना आगामी वर्षभरात प्रस्तावित करून ती कामे पूर्ण करण्याचे आश्वासनही आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिले.
———–
कोट
मतदारयादीच्या शुद्धतेसाठी एसआयआर अत्यंत आवश्यक
मतदार यादीच्या शुद्धतेसाठी शासनाकडून राबविण्यात येणारी मतदारयादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहीम अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी बिनचूक अर्ज भरून यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि राष्ट्रहिताचे कर्तव्य पार पाडावे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



