प्रभाग २२,२३ आणि प्रभाग ६ च्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी किसन जाधव यांची प्रभावी मागणी; महापौरांकडून सकारात्मक ग्वाही

सोलापूर
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२, २३ आणि प्रभाग ६ मधील नागरिकांना स्वच्छ, निर्मळ, उच्च दाबाने व नियमित पाणीपुरवठा व्हावा, तसेच वाढत्या लोकसंख्येचा व प्रभागाच्या विस्ताराचा विचार करून नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीची उभारणी करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक किसन जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रभाग २२,२३ आणि ६ च्या झोन क्रमांक ६ च्या अंतर्गत बैठकीत केली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस महापौर विनायक कोंडयाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, प्रभाग २२ च्या नगरसेविका चैत्राली गायकवाड,प्रभाग २३ चे नगरसेवक राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेवक ऋषिकेश मेट्रे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड,महादेव अण्णा गवळी,अर्जुन गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्यंकटेश चौबे, झोन क्रमांक ६ चे विभागीय अधिकारी पानगल,पीएची विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, प्रभाग क्रमांक २२ व २३ मधील नागरिकांना अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची ही समस्या तातडीने सोडवून त्यांना नियमित, स्वच्छ व उच्च दाबाने पाणी मिळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. तसेच प्रभागाचा वाढता विस्तार लक्षात घेता नवीन पाणीटाकी उभारणे अत्यावश्यक झाले आहे. यावर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्यंकटेश चौबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येतील, तसेच नागरिकांना अधिक चांगला व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी विभाग सकारात्मक असल्याचे सांगितले.

महापौर विनायक कोंडयाल यांनीही या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रभाग क्रमांक २२, २३ आणि प्रभाग ६ मधील नागरिकांना स्वच्छ, निर्मळ आणि उच्च दाबाने नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. आवश्यक उपाययोजना करून येत्या काही दिवसांत ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नगरसेवक किसन जाधव यांना दिली. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १३७५ कोटी रुपये मंजूर झाले ह्या अंतर्गत ही बैठक पार पडली.



