हनीट्रॅपद्वारे युवकाचे अपहरण; दोन दिवसांत पोलिसांनी केली सुटका, आठ आरोपी जेरबंद

विजयपूर
प्रतिनिधी / दीपक शिंत्रे
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या युवकाच्या अपहरण प्रकरणाचा विजयपूर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत यशस्वी छडा लावत अपहरण झालेल्या युवकाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात एका तरुणीसह आठ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कस्तुरी कॉलनी येथील रहिवासी ममताज इमामजाफर चप्परबंध यांनी 19 जून रोजी आपल्या मुलगा साहिल इमामजाफर चप्परबंध (वय 22) याचे अपहरण झाल्याची तक्रार गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून तपास सुरू केला.
जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांवर आरोपींचा डोळा
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. साहिल हा विजयपूर शासकीय रुग्णालयात स्वयंपाक सहाय्यक म्हणून कार्यरत असून, दोन महिन्यांपूर्वी त्याच्या कुटुंबाने दोन एकर जमीन 26 लाख रुपयांना विकली होती. या व्यवहाराची माहिती साहिलने त्याचा सहकारी मोहम्मद रफीक याला दिली होती.
याच माहितीच्या आधारे आरोपींनी पैशांसाठी साहिलचे अपहरण करण्याचा कट रचला. त्यासाठी विजयलक्ष्मी तोनश्याळ या तरुणीमार्फत साहिलशी मैत्री वाढविण्यात आली. 18 जून रोजी विजयलक्ष्मीने साहिलला फोन करून शासकीय रुग्णालयाच्या मागील मोकळ्या जागेत भेटण्यासाठी बोलावले. तेथे पोहोचताच आरोपींनी स्कॉर्पिओ वाहनातून त्याचे अपहरण केले.
अपहरणानंतर आरोपींनी साहिलच्या मोबाईलवरून त्याच्या आईला फोन करून, “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवायचे असेल तर 12 लाख रुपये द्या,” अशी खंडणीची मागणी केली.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला
घटनेनंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि अन्य तांत्रिक साधनांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात आरोपी विजयपूरहून गदग, तेथून गोवा आणि पुढे बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा परिसरात गेल्याचे निष्पन्न झाले.
21 जून रोजी पोलिसांनी घटप्रभा परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत साहिलची सुखरूप सुटका करण्यात आली तसेच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
गोपाल यमनप्पा मादर (वय 28)
निंगप्पा भूताळी नावदगी (वय 27)
मोहम्मद रफीक नधाप (वय 27)
विजयलक्ष्मी तोनश्याळ (वय 24)
दशरथ सोमप्पा मादर (वय 21)
शिवानंद मृत्युञ्जय नंदिकोलमठ (वय 25)
सुनील गिरीमल्लप्पा नावी (वय 20)
शिवकुमार शरणप्पा होसट्टी (वय 23)
पोलिसांनी अपहरणासाठी वापरण्यात आलेली एमएच-06-एडब्ल्यू-7474 क्रमांकाची स्कॉर्पिओ तसेच सात मोबाईल फोन जप्त केले आहेत.
या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावून युवकाची सुखरूप सुटका करणाऱ्या तपास पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी विशेष कौतुक केले आहे.



