आय. एम. एस. चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा मानस गायकवाड व सान्वी गोरे यांना विजेतेपद
विविध वयोगटात आयुष, नियान, पृथा व ईशा अव्वल

सोलापूर
डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने चॅम्प चेस स्कूल व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’आय. एम. एस. चषक’ १७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय खुली व मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सहा पैकी सहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले तर आदिराज म्हेत्रेने आकर्षक खेळत साडेपाच गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले. तसेच मुलींच्या गटात चुरशीने झालेल्या स्पर्धेत बार्शीची राष्ट्रीय खेळाडू सान्वी गोरे व अनन्या उलभगत यांचे प्रत्येकी पाच पैकी साडेचार गुण मिळविले.
परंतु टायब्रेकरमध्ये सरस बुचोल्स गुणांसह सान्वीने जेतेपद तर अनन्याने द्वितीय क्रमांक पटकाविला. चौघांचीही निवड मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच आयुष जानगवळी, नियान कांदिकटला, पृथा ठोंबरे व ईशा पटवर्धन यांनीदेखील आकर्षक खेळ करत अनुक्रमे १२ व ८ वर्षांखालील गटात अव्वल स्थान मिळविले.
इंडियन मॉडेल स्कूल येथे सुरू संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मॉडेल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व आय.एम. एस. स्कूलचे समन्वयक सचिन ढवण, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, स्पर्धेचे प्रमुख पंच उदय वगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात आदिती कुलकर्णी यांनी उपस्थित खेळाडू व पालकांना खेळाचे महत्त्व पटवून देत आगामी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.
विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहाय्यक पंच म्हणून प्रज्वल कोरे, पद्मजा घोडके आदींनी यशस्वीरित्या काम पाहिले. मिथिलेश होर्टीकरला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, इंडियन मॉडेल्स स्कूलचे संस्थापक सचिव अमोल जोशी, श्री. साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, आंतरराष्ट्रीय पंच व मार्गदर्शक सुमुख गायकवाड व अतुल कुलकर्णी, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.
अंतिम निकाल (अनुक्रमे क्रमांक, गुण व बोकोल्स गुणांसह):
खुला गट:मानस गायकवाड-६,आदिराज म्हेत्रे- ५.५,नागेश राजमाने- ५(२०),प्रतीक वल्लाकट्टी-५(१८),देवदत्त पटवर्धन-४.५,
१२ वर्षे मुले: आयुष जानगवळी-५,मयूर स्वामी-४.५,श्रेयस कुदळे-४(२५),श्रेयश इंगळे-४(२२.५),आदित्य जानगवळी-४(२०.५)
८ वर्षे मुले: नियान कंदीकटला-४(२२.५), आरुष माने-४(१८),आयुष बदवने-३(२०.५),कृष्णराज पटाले-३(१९),अद्विक ठोंबरे-३(१६.५)
१७ वर्षे मुली: सानवी गोरे-४.५(१४.५),अनन्या उलभगत-४.५(१२.५),श्रावणी देवनपल्ली-४(१४.५),तेजल चीलगुंडे-४(१२),प्रतीक्षा चाबुकस्वार-३
१२ वर्षे मुली:पृथा ठोंबरे-४(१२.५),सानवी होर्टीकर-३,स्वराली बिराजदार-२(१४.५),अनुष्का शिंदे-२(१३.५),ओजस्वी बोराळे-२(१२)
८ वर्षे मुली: ईशा पटवर्धन-३,अधिरा रोकडे-२(११),त्रिशा पाडुळे-२(१०),हिंदवी मोरे-१



