सोलापुरात मोठी कारवाई, आलिशान कारमधून एक टन कथित गोमांस जप्त
विजापूर रोडवर पोलिसांचा सापळा, मांस वाहतूक प्रकरणी चालक ताब्यात

गोरक्षकांच्या माहितीवरून धडक कारवाई, कारमधून मोठ्या प्रमाणात मांस जप्त
सोलापूर : प्रतिनिधी
विजापूर रोड परिसरातून आलिशान कारमधून कथित गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि गोरक्षकांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी एमएच-०३-एएम-०३४६ क्रमांकाच्या फोर्ड इंडीवर कारमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. विजापूर नाका पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांनी संबंधित वाहनाचा शोध घेत सापळा रचला. सोरेगाव परिसरात वाहन आढळल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला. अखेर सैफुल परिसरात पोलिस आणि गोरक्षकांच्या मदतीने वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध पोत्यांमध्ये जनावरांचे अवयव, चरबी, शिंगे, कातडी तसेच डिक्कीत मोठ्या प्रमाणात मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कारवाई दरम्यान सुमारे एक टन मांस जप्त करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. पोलिसांनी वाहन जप्त करून चालक फैजान मुंन्शी व अरबाज शेख याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोलापूर शहर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारवाईत गोरक्षक लतेश हिरवे, प्रसाद झेंडगे, सुरज शिंदे, अक्षय बनसोडे तसेच हिंदवी सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मांसाचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत असून तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.



