विजयपूर जिल्ह्यात विशेष अंमली पदार्थविरोधी मोहीम
61.770 किलो गांजा जप्त - एसपी निंबरगी

विजयपूर/ दिपक शिंत्रे
विजयपूर
जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी जिल्हा पोलिस विभाग सातत्याने कठोर कारवाई करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 जून ते 16 जून 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करताना त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सात जना विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 61.770 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ₹15.78 लाख आहे.
कारवाईत सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 34.400 किलो गांजा जप्त करण्यात आला, मनगूळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15.060 किलो गांजा जप्त करण्यात आला, तर गोलगुंबज पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र प्रकरणांत 11.295 किलो गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय देवरहिप्परगी, आलमेल आणि बसवन बागेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही गांजा विक्रीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत, असे एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी स्पष्ट केले आहे.
अंमली पदार्थांची विक्री व सेवन यावर आळा घालण्यासाठी पोलिस विभाग भविष्यातही अशा विशेष मोहिमा सुरू ठेवणार असून, नागरिकांनी यासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी केले आहे.
बॉक्स
व्यसनाधीनांविरोधातही कारवाई
विशेष मोहिमेदरम्यान मनगूळी, निडगुंडी, मुद्धेबिहाळ, ताळिकोटे आणि बबलेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गांजाचे सेवन (व्यसन) केल्याप्रकरणी एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.



