पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपपूर्ती म्हणजे विकसित भारताची नांदी
पालकमंत्री जयकुमार गोरे : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीबाबत मांडली विकासाची भूमिका

सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देश वेगाने विकास साधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही तपपूर्ती म्हणजे विकसित भारताची नांदी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विकासाची भूमिका मांडली.
पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून देशभरात अमुलाग्र बदल होत असून पायाभूत सुविधा वाढत आहेत. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा आणि विकासापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची पूर्ण काळजी घेऊन मोदी सरकार काम करत आहे. सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभरात दळणवळणाची साधने उपलब्ध करून देऊन सर्वोत्तम रस्ते बांधत मोदी सरकारने दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती केली आहे.
रेल्वेचे आधुनिकीकरण, नवे रेल्वे मार्ग, वंदे भारतसारख्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या, मेक इन इंडिया ला प्राधान्य देत उद्योग क्षेत्रात भारताने साधलेली प्रगती ही भारताच्या उज्वल भवितव्याची साक्ष आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.
देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा सिंचन योजना, नमो किसान सन्मान योजना अशा योजना अमलात आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशभरातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यशस्वी प्रयत्न केले आहेत.
गेल्या ७५ वर्षांत नागरी विकास क्षेत्रात सर्वाधिक कार्य मोदी सरकारने केले आहे. आयुष्यमान भारत योजनेसारखी जगातील सर्वात मोठी योजना अमलात आणून आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरीव कामगिरी केली आहे.
भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे या आग्रही भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन गेल्या १० वर्षांत १० लाख घरे महाराष्ट्रात बांधली आहेत. यातील ५ लाख घरांचे लोकार्पणही झाले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ३० लाख घरांच्या बांधकामाला मंजुरीही मिळाली आहे. या दोन्ही टप्प्यांमध्ये जे घटक घर मिळण्यापासून वंचित राहिले आहेत अशा घटकांसाठी नव्याने सर्व्हेक्षण करण्यात आले असून भारतातील प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चितपणे पूर्ण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासनात शिस्त आली असून कामाचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा विश्वास मोदी सरकारने संपादित केला आहे. डिजिटल क्षेत्र, महिला सक्षमीकरण, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे, अटल सेतू, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, देशाची संरक्षण सिद्धता, या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामगिरी आदर्शवत अशीच आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
गेल्या ६७ वर्षांमध्ये भारतात ७४ विमानतळे बनवण्यात आली होती. परंतु गेल्या १२ वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नव्याने ९० विमानतळे बांधली असून आज देशात १६४ विमानतळे आहेत. सोलापूरला देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापूरची विमानसेवा सुरू केल्याचेही पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले. तसेच उड्डाणपूल आणि आयटी पार्कचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पाच ठिकाणांचा पंचतीर्थ या नावाने केलेला विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेले उपक्रम, महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा केलेला निर्णय हे मोदी सरकारची समाजाभिमुख भूमिका स्पष्ट करतात.
हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रभू श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर तसेच उज्जैन येथील श्री महाकाल कॉरिडॉर म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उचललेली विशेष पावले आहेत. वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर येथे देखील कॉरिडॉर करण्यात येणार आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारत सर्वच क्षेत्रात विकसित होत असून चौथी आर्थिक महासत्ता म्हणून जगासमोर कामगिरी करत आहे. भारत आता लवकरच जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या दमदार कामगिरीमुळे भारतीयांनी मोदी सरकारवर वारंवार विश्वास दाखविल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले.
या पत्रकार परिषदेस भाजपचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख उपस्थित होते.
———–
चौकट १
एक कोटी महिलांना करणार लखपती दीदी
महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता नारीवंदन विधेयक मंजूर करण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी लखपती दीदी योजनेतून ५० लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे. आगामी काळात एकूण एक कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे ध्येय असल्याचेही पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
———–
चौकट २
नाईट लँडिंग सुरू करून विमानसेवा जोमाने ठेवणार सुरू
सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नसल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत. नाईट लँडिंगसाठी काही कायदेशीर अडचणी असून त्यातील त्रुटी पुढील १५ दिवसांत दूर करण्यात येतील. न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर अतिक्रमणे निष्काशीत करावीच लागतील. वेळ पडली तर सक्तीने ही अतिक्रमणे काढून विमानसेवा जोमाने सुरू ठेवणार आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निर्धारपूर्वक सांगितले.



