क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी
लोकनाथ मीडिया क्रिकेट चषक स्पर्धेस युवा सेना राज्य सचिवांची सदिच्छा भेट

रेल्वे मैदानावर आज रंगणार फायनल सामना
सोलापूर :
पत्रकारितेच्या व्यवसायात निश्चित वेळ नसते. सततच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत लोकनाथ मीडिया क्रिकेट चषक यासह
फुटबॉल, हॉकीसारख्या स्पर्धांमुळे पत्रकारांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ऊर्जा मिळते. त्यामुळे अशा स्पर्धा आरोग्य संवर्धनाचे प्रभावी माध्यम ठरतात.पत्रकारांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी(पुणे) यांनी सोलापुरात केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी १२ ते १४ जून २०२६ या तीन दिवसात रेल्वे मैदान, सोलापूर येथे ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेस सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर आदींसह मान्यवर उपस्थित होते. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते साळी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी किरण साळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध लोकाभिमुख योजनांचा उल्लेख करत पत्रकारांसाठी राबविण्यात आलेल्या सुरक्षा आणि कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धेचे संयोजन करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
आपण स्वतः पत्रकार कुटुंबातील असल्याचे सांगताना त्यांनी भावनिक आठवणींना उजाळा दिला. माझे वडील आणि आजोबा पत्रकार होते. पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळ, तणाव आणि जबाबदाऱ्या मी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे पत्रकारांसाठी आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन शंकर पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब पाटील यांनी केले. सोलापुरात होत असलेल्या ‘लोकनाथ’ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला. यावेळी मैदानावर विविध वृत्तवाहिनी वृत्तपत्रांचे पत्रकार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज स्पर्धेचा अंतिम सामना
रेल्वे मैदानावर रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सेमी फायनल मॅच लोकमत विरुद्ध डिजिटल मिडिया ,
तरुण भारत संवाद विरुद्ध राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यात होणार आहे. त्यानंतर फायनल मॅच होणार आहे. याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
—



