सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार – बावनकुळे
मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घोषणा

मुंबई, ९ जून २०२६
मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान
महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तसेच आपल्या ओघवत्या वाणीने तरुण पिढीत चैतन्य निर्माण केल्याबद्दल गौर गोपाल दास यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाजाचा आरसा बनवून पत्रकार आम्हाला विविध कामे सुचवतात. चुका दाखवून देतात. त्यामुळे आधी प्रभावी विरोधक म्हणून आम्हाला काम करता आले आणि आता आम्ही लोकाभिमुख राज्यकारभार करून शकत आहोत. पत्रकारांचे राज्याच्या विकासामध्ये योगदान मोठे आहे.”
ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई प्रमाणे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा दिली जाईल. पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले आहेत तसेच भविष्यातही घेण्यात येतील.
“वृत्तपत्र वाचूनच मराठी शिकत आहे” – राज्यपाल
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून काम करत असताना मी मराठी भाषा देखील शिकत आहे. मराठी वृत्तपत्रांचा मला त्यासाठी उपयोग होत आहे. यावेळी मी इंग्रजीत बोलत असलो तरी पुढच्या वेळी मी मराठीत भाषण करीन.” कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
“पत्रकारांनी सत्य मांडताना घाबरू नये” – गौर गोपाल दास
‘पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर गौर गोपाल दास यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अलीकडे आपली नोकरी टिकवण्यासाठी पत्रकार अनेक दडपणांखाली काम करताना दिसतात. बहुतांश पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडण्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारलेला असतो. पत्रकारांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्यातूनही मार्ग काढत पत्रकारांनी यथाशक्ती सत्याची मांडणी करावी. त्यामुळे त्यांची घुसमट कमी होऊन त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. मृणालिनी नानिवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. “एआय हा पत्रकारांसाठी मदतनीस आहे, मात्र तो पत्रकार होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.
आदर्श पत्रकारिता पुरस्कार
यावेळी भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, इनपुट एडिटर, एबीपी माझा; संजय मलमे, संपादक, नवराष्ट्र; गणेश मोरे, इनपुट हेड, झी 24 तास; प्रकाश सावंत, संपादक, नवशक्ती; शिवाजी शिंदे, इनपुट एडिटर, साम टीव्ही; आणि शैलेंद्र शिर्के, संपादक, पुण्यनगरी यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कृतज्ञता सन्मान
अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.
राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.



