हिंदुत्वाचे प्रेरणास्थान योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हिंदू स्वाभिमान दिवस’ उत्साहात विश्व हिंदू महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा…

सोलापूर
हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि संस्कार यांचा जागर करत विश्व हिंदू महासंघ (भारत) महाराष्ट्र प्रदेश, सोलापूर जिल्हा शहर कार्यकारणीच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते महंत योगी आदित्यनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हिंदू स्वाभिमान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात सोलापूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रभक्ती, हिंदू संस्कृतीचा अभिमान आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव यांचा संगम अनुभवायला मिळाला.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारमूल्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास राष्ट्रीय मंत्री व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तुषार बोहरा, युवा प्रकोष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश सहप्रभारी राहुल बोहरा, प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर झंवर, प्रदेश संघटन महामंत्री सतीश आनंदकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष सुयश खानापुरे व राष्ट्रीय आयटी सेल प्रमुख महेश जिंदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख वक्ते प्रा.डॉ.हिंदूश्री शिवरत्न शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश-अपयशाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला दिला.हिंदू संस्कृती संकटांशी लढण्याची प्रेरणा देते,असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
युवा प्रकोष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष राहुल बोहरा यांनी योगी आदित्यनाथ महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना निर्भय हिंदुत्व, सुशासन आणि राष्ट्रहिताचे प्रतीक संबोधले. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व प्रदेश संघटन महामंत्री सतीश आनंदकर यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे उद्याच्या राष्ट्रनिर्मात्यांचा गौरव असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत संस्कार, राष्ट्रभक्ती आणि हिंदू अस्मितेचा अभिमान विद्यार्थ्यांच्या मनात रुजणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.ज्ञान, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा या त्रिसूत्रीच्या बळावर युवकांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. सूर्यप्रकाश कोठे, श्रीनिवास संगा, गौरीशंकर वर्मा, जिल्हाध्यक्ष सुयश खानापुरे, जिल्हा संघटन महामंत्री कपिल कोळी, शहर संघटन महामंत्री सागर तांबोळकर यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रभक्ती, हिंदू स्वाभिमान आणि संस्कारमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश दिला.



