कामगार वस्तीमधील चाळकरी आणि टाळकरी श्री.गजानन महाराजांच्या भक्तीरसात चिंब !
"श्रीं" च्या दर्शनासाठी पालखी मार्गावर दूतर्फा गर्दी

दोन दिवसांच्या सोलापूर मुक्कामानंतर गजानन महाराजांचे पंढरीकडे प्रस्थान !
===================
सोलापूर –
– मुखी हरीनाम, कपाळी केशरी गंध,टाळ मृदंगाचा गजर, गजाननांचा जयघोष करत दोन दिवसांचा सोलापूर मुक्काम आटोपून शेगावी राणा श्री. गजानन महाराज सोमवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी दमानी नगरातून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा गजानन महाराजांची पालखी सात रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, पार्क चौक, रामलाल चौक, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन, रामवाडी येथील मोदी रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकीमार्गे लक्ष्मी – विष्णू चाळ येथे जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या प्रांगणात दहा वाजता काही वेळासाठी विसावली. या ठिकाणी चाळकरी आणि टाळकरी एकत्र आल्यामुळे भाविक भक्तीरसात चिंब झाले. बी टू चा प्रश्न मार्गी लागल्यामुळे तसेच रेल्वे पुलाच्या कामामुळे प्रथमच गजानन महाराज पालखी कामगारांच्या चाळीत आल्यामुळे रहिवाशी भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.

पालखी मार्गावर दुतर्फा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पालखीचे रांगोळ्याच्या पायघड्या टाकून आणि पुष्पवृष्ठी करून पालखीचे स्वागत करण्यात येत होते.गण गण गणात बोते च्या जयघोषात पालखी साडेदहा वाजता लक्ष्मी विष्णू चाळीतून दमानी नगरकडे निघाली. मरिआई चौक, गवळी वस्ती मार्गे पालखी दमानी नगरातील दमानी अंध शाळेत विसावली. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

वारकऱ्यांना यावेळी परंपरेप्रमाणे भोजन देण्यात आले. त्यानंतर दुपारी गजानन महाराज सोलापूरकरांचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झाले.देगाव नाका, कोयना नगर, देगाव, बेलाटी तांडा, BMIT मार्गे सायंकाळी तिऱ्हे गावात पोहोचणार आहे.सोमवारी तिऱ्हे गावात पालखीचा मुक्काम आहे.पालखी मार्गावर ठिकठिकाणी जल्लोषात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येत होते.




