नीट पेपरफुटी प्रकरण : जंतर-मंतरवरील आंदोलनाला ‘WOW’ संघटनेचा पाठिंबा; विद्याताई लोलगे यांची उपस्थिती

नवी दिल्ली, दि. 20
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. परीक्षेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलनात सहभागी झालेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल १९ दिवस उपोषण केले. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून, आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.
दरम्यान, WOW (वाव) संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांनी जंतर-मंतर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी सोनम वांगचुक तसेच अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या न्यायाच्या लढ्याला समर्थन दर्शविले.
यावेळी विद्याताई लोलगे यांनी देशातील युवक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.



