maharashtrapoliticalsocialsolapur

पात्रता नसताना मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते

आमदार देवेंद्र कोठे यांची खासदार प्रणिती शिंदे यांना जोरदार चपराक : संस्कृत वडिलांचा आदर्श घेण्याचाही सल्ला

 

सोलापूर : प्रतिनिधी

खासदार असूनही वर्षातून दर तीन महिन्यांनी सोलापूरला येणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी पात्रता नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खा. प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते अशी जोरदार राजकीय चपराक आमदार देवेंद्र कोठे यांनी खा. प्रणिती शिंदे यांना लगावली.

नसरापूर येथील प्रकरणाबाबत खा. प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदार देवेंद्र कोठे यांना प्रतिक्रिया विचारली असता आ. देवेंद्र कोठे यांनी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

 

 

 

 

 

आ. देवेंद्र कोठे म्हणाले, नसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित शिक्षा मिळवून दिल्याची कित्येक उदाहरणे आहेत. असे असताना खा. प्रणिती शिंदे मात्र प्रसिद्धीसाठी धडपड करत आहेत. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे, बूम दिसल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळविल्याशिवाय रहावत नाही, असेही आ. देवेंद्र कोठे म्हणाले.

 

 

 

 

 

सुशीलकुमार शिंदे देखील अनेक वर्षे केंद्रीय गृहमंत्री होते. त्या काळातही अनेक अनिष्ट घटना देशभरात घडल्या. त्यावेळी आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला राजीनामा मागितला का ? असा सवालही आ. कोठे यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

खा. प्रणिती शिंदे यांना जनतेने खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची कामे करावीत. विकासावरून राजकारण करू नये. एकीकडे निधी मिळत नाही अशी ओरड करायची आणि दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासारख्या भाजपाच्या आमदारांना भाजप सरकारकडून मिळालेल्या निधीचे श्रेय घ्यायचे असा प्रकार खा. शिंदे करत आहेत. मंजूर होणाऱ्या योजनांचे पत्र द्यायचे, नेत्यांसोबत फोटो काढायचे आणि ते काम मीच केले असे म्हणत श्रेय घेण्याची घाण सवय खासदार प्रणिती शिंदे यांना आहे. त्यांची बाजू जर खरीच सत्याची असती तर त्यांनी विमानसेवा, वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांचे आभार मानले का ? असा प्रश्नही आ. देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला.
————–
चौकट १

खा. प्रणिती शिंदे यांना सकल हिंदू समाजाची एलर्जी

नसरापूर येथील पीडित कुटुंबाबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांना खरोखरच सहानुभूती असती तर त्यांनी काँग्रेस भवनपासून अवघ्या काही अंतरावर सुरू असलेल्या सकल हिंदू समाजाच्या निषेध आंदोलनात सहभागी व्हायला हवे होते. परंतु खा. प्रणिती शिंदे यांना सकल हिंदू समाजाची एलर्जी असल्यामुळे त्यांनी तेथे जाण्याचे जाणीवपूर्वक टाळले, असेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.
———
चौकट २

सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपण्याचा सल्ला

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने खा. शिंदे यांच्या घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे सर्व पक्षांशी घनिष्ठ संबंध आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुशीलकुमार शिंदे यांनी अमेरिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. असे असताना खा. शिंदे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत आहेत. खालच्या पातळीवरील टीका करत आहेत. खा. प्रणिती शिंदे यांनी राजकीय अनुभवानुसार बुद्धीतही वाढ करावी, असा सणसणीत टोलाही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button