शहर विकासाला नवी गती देणारे नेतृत्व – आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे :-महापौर विनायक कोंड्याल..

सोलापूर
सोलापूर महानगरपालिका चे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आयुक्त पदावर यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल आज त्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहर प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आयुक्तांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. ओम्बासे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात शहरातील विविध विकासकामांना गती मिळाली. प्रलंबित प्रकल्पांना चालना देणे, स्वच्छता मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी, रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणणे, महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करणे या बाबींमुळे प्रशासनाची प्रतिमा अधिक सक्षम झाली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय वाढवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात डॉ. ओम्बासे यांचे योगदान मोलाचे आहे. शहराच्या भविष्यासाठी दीर्घकालीन नियोजन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि डिजिटल प्रशासन प्रणाली यांना त्यांनी प्राधान्य दिले असून त्यामुळे सोलापूरच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष रोहिणी तळवडकर, उपायुक्त आशिष लोकरे, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक किसन जाधव तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही डॉ. ओम्बासे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत प्रशासनातील शिस्त, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांचा विशेष उल्लेख केला. शहराच्या हितासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण, स्नेहपूर्ण आणि सकारात्मक भावनांनी भरलेले होते. आयुक्तांच्या वर्षपूर्ती निमित्त शहर विकासासाठी नव्या संकल्पांचा पुनरुच्चार करण्यात आला.



