शांती चौक परिसरातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी; सुधारणा करण्याचे दिल्या सूचना…

सोलापूर :
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सुर्यप्रकाश राजेश कोठे यांनी शांती चौक, गांधी नगर, रंगराज नगर (हैद्राबाद-विजापूर बायपास जवळ) येथील पदमशाली समाजचे स्मशानभूमी व हिंदू स्मशानभूमीची दयनीय अवस्था लक्षात आणून देत महापौर श्री विनायक दादा कोंड्याल यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी आज पदमशाली समाजचे स्मशानभूमी व हिंदू स्मशानभूमी तसेच जडे साब मुस्लिम कब्रस्तान संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त सौ. वीणा पवार,पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सुर्यप्रकाश राजेश कोठे,अध्यक्ष सुरेश फलमारी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी अनिल चारटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पाहणीदरम्यान स्मशानभूमीत योग्य नावफलक नसणे, संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराचा अभाव, सर्वत्र कचरा व अस्वच्छता, तसेच अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित व सन्मानजनक प्रवेशमार्ग नसल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब महापौरांनी गांभीर्याने घेतली.

महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार (गेट) उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे, स्पष्ट व सुबक नावफलक लावण्याचे तसेच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा व सुरक्षित प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

“स्मशानभूमी ही आपल्या संस्कृती, श्रद्धा व मानवी संवेदनांशी निगडित जागा आहे. या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता व सन्मान अबाधित राहणे आवश्यक आहे. नागरिकांच्या भावनांचा आदर राखून आवश्यक त्या सर्व सुधारणा तातडीने करण्यात येतील,” असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.
महापौरांच्या या तत्पर भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




