साहित्य संवर्धन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात आधुनिकता आणणार – सिने अभिनेते योगेश सोमण….

सोलापूर, (प्रतिनिधी):
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात सुसुत्रता आणि आधुनिकता आणणार असल्याचे प्रतिपादन साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार तथा प्रसिध्द सिने व नाट्य अभिनेते लेखक योगेश सोमण यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सोलापूर दौर्यावर आले असताना बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी त्यांनी सोलापूर शहरातील मसापच्या विविध शाखेच्या पदाधिकारी आणि सभासदांच्या भेटी घेवून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
साहित्य संवर्धन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद यादी अद्ययावत करणे, साहित्य पत्रिका प्रत्येक सभासदांपर्यत सहज पोहोचावी नवीन आणि तरूण साहित्यकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे तरूण आणि ज्येष्ठ यांची योग्य सांगड घालणे, परिषदेचा कारभारात सुसुत्रता आणून आधुनिकतेची जोड देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. आमची पाटी कोरी आहे त्यावर चांगले उपक्रम करण्याची आम्हाला संधी द्यावी असेही यावेळी ते म्हणाले.
पंचवार्षिक निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी प्रसिध्द सिने आणि नाट्य अभिनेते लेखक योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी डॉ. स्वाती महाळंक तर कोषाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निफाडकर असे उमेदवार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रारंभी अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर शरकुमार एकबोटे, शोभा बोल्ली, गिरीष दुनाखे, गोविंद काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह सुनिल इंगळे, नरेंद्र काटीकर, जितेश कुलकर्णी, विनायक होटकर, प्रकाश मोकाशे, विशाल शिंदे, दिपक जाधव, अविनाश महागांवकर, अश्विनी चव्हाण, आण्णासाहेब कोतली यांच्यासह साहित्य परिषदेचे सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सभासदांना दि. 6 फेब्रुवारी पासून मतपत्रिका घरपोच मिळणार आहेत त्यावर साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांच्या नावापुढे मतदान करून त्या मतपत्रिका सोबत आपल्या आधार कार्डची झेरॉक्स त्यावर सही आणि पाकीटावर सही करून योग्य ते पोस्ट तिकिट लावून दि. 12 मार्च पुर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील कार्यालयात पोहोच होतील याची काळजी सभासदांनी घ्यावी असेही यावेळी सांगण्यात आले.



