स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकास अपहरण करुन डांबुन ठेवुन मारहाण करुन २ कोटी खंडणी मागितल्याचे प्रकरणी ९ जणांची निर्दोष मुक्तता:- ॲड. मिलिंद थोबडे
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह ११ जणांविरुध्द दाखल करण्यात आलेला खटला

सोलापूर
मौजे दहिटणे, ता. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चवतराव लावंड यास अपहरण करुन त्याचेकडील रिव्हॉल्वर व रोख रक्कम काढून घेवून त्यास सोलापूर येथील वाडधामध्ये डांबुन ठेवून मारहाण करुन २ कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातुन १) बसलिंगप्पा शिवशरण खेडगी, २) अशोक भद्रप्पा मुलगे, ३) चंद्रकांत नामदेव मिसाळ, ४) शोएब इसाक पटेल, ५) अमोल गोविंद नाईकोडे, ६) मारुती नारायण माने, ७) सचिन कृष्णा शिंदे, ८) कुणाल काशिनाथ जगताप व ९) अजय सुभाष सारंगमठ यांची मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.जे. कटारिया यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, श्री स्वामी समर्थ सरकारी कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चवतराव लावंड यास दि.०८/०२/२०१३ रोजी सायंकाळी ०४.३० वा. सुमारास तत्कालीन चेअरमन सिद्रामप्पा पाटील यांनी कारखानास्थळी त्यांचे केबिनमध्ये बोलावून घेवून ऊस पुरवठा करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या कामास न आल्याने कारखाना ऊस पुरवठा अभावी बंद करावा लागत असल्याने कारखान्याचे २ कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याने ते २ कोटी रुपये दे असे त्यास म्हणून तत्कालीन संचालक बसलिंगप्पा खेडगी व सशस्त्र अंगरक्षक अमोल नाईकोडे यांना प्रल्हाद लावंड यांची अंगझडती घ्यायला लावून त्याचेकडील रोख ७,०००/- एटीएम कार्ड, गाडीची चावी व रिव्हॉल्वर काढून घेवून त्यास बेशुध्द होईपर्यंत बेदम मारहाण करण्यास लावून तेथुन त्यास कारमध्ये जबरदस्तीने घालुन सोलापूर येथील इन चॅनलचे कार्यालय असलेल्या वाङधामध्ये आणून डांबुन ठेवले व तेथेदेखील मारहाण करुन त्याचे रखवालीस सचिन शिंदे व कुणाल जगताप यास ठेवून त्याचेकडे व त्याच्या पत्नीकडे रोख रक्कम रुपये २ कोटीची खंडणी मागितली.

ॲड. मिलिंद थोबडे
त्यानंतरदि.११/०२/२०१३ रोजी प्रल्हाद लावंड याने त्यास सोलापूर येथील वाड्यात डांबुन ठेवले असून त्याचा घातपात होण्याची शक्यता आहे व त्याला वाचवावा असा मेसेज मोबाईलद्वारे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक संजीवकुमार पाटील यांना पाठवून मदत मागितल्याने त्या संदेशाच्या आधारे पोलीस उपअधिक्षक अशोक जाधव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सदर बंद वाडचात बाजुच्या इमारतीवरुन प्रवेश करुन प्रल्हाद लावंड यांची तेथुन सुटका केली व सचिन शिंदे व कुणाल जगताप यांना अटक केली. अशा आशयाची फिर्याद सुरुवातीस प्रल्हाद लावंड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर सदर गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याचे सुनावणी दरम्यान मा.आमदार सिद्रामप्पा पाटील, काशिनाथ भरमशेट्टी व हुसेन भैरामडगी यांचे निधन झाले. खटल्याचे सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याचे अंतिम युक्तीवादावेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आरोप ठेवण्यात आलेल्या घटना पाहणारा स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही, फिर्यादीचे रिव्हॉल्वर, एटीएम कार्ड, गाडीची चावी त्याचे राहते घरातून जप्त करण्यात आली आहे, सचिन शिंदे व कुणाल जगताप यांना घटनास्थळावरुन अटक केल्याचा पुरावा नाही, २ कोटी रुपयाची मागणी खंडणी नसुन कारखान्याची येणेरक्कम असल्याचे पुराव्यावरुन दिसुन येत असल्याचे सांगुन अनोळखी आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली नाही, फिर्यादीने पोलीस उपअधिक्षक यांना पाठविलेल्या मेसेजबाबत कोणताही पुरावा मिळुन आला नाही असे मुद्दे मांडून त्या पृष्ठर्थ मे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरुन मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. आर.जे. कटारिया यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. राजकुमार मात्रे यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले.
निकाल ऐकायला अप्पा हवे होते… ॲड. मिलिंद थोबडे
या खटल्यामध्ये दि.११/०२/२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला व दि.१५/११/२०१४ रोजी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी ११ वर्षे २१ दिवस चालली व दरम्यान माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची प्रकृती खालावल्याने दि. १८/१०/२०२५ रोजी मे. न्यायालयाने त्यांचा जबाब त्यांचे राहते घरी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे नोंदविला व त्यानंतर दि. १७/११/२०२५ रोजी सदर खटल्याचे निकालाकरीता तारीख नेमण्यात आली होती. परंतु त्यापुर्वीच दि.१३/११/२०२५ रोजी मा. आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे प्रदिर्घ चाललेल्या खटल्यातुन निर्दोषत्व ऐकण्यासाठी अप्पा हवे होते अशी खंत ॲड. मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केली.*



