राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला मतदान, १६ रोजी निकाल…

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केला आहे. या घोषणेसोबतच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक रणांगणात उतरले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची ३१ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येणार असून, नियमबाह्य अथवा अपूर्ण अर्ज बाद केले जाणार आहेत.
अर्ज छाननीनंतर उमेदवारांना २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होईल. ३ जानेवारी रोजी अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सर्व महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी मतदान होईल. मतदानानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. शहरांच्या विकासाशी संबंधित पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, घरकुल योजना, आरोग्य सुविधा आदी प्रश्नांवर या निवडणुकांत जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू झाली असून, विकासकामांच्या घोषणा, शासकीय कार्यक्रमांवर निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.



