जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आचेगाव येथील तिघांची निर्दोष मुक्तता:- ॲड. मिलिंद थोबडे…

सोलापूर
रेवनसिद्ध पुंडलिक उपाध्ये यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शावरसिद्ध आमसिद्ध कुंभारे, वय:-24, गेनसिद्ध आमसिद्ध कुंभारे, वय:- 28, आमसिद्ध गेनप्पा कुंभारे, वय:- 62 सर्व आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा यांचे समोर होऊन त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, आरोपी हे रेवणसिद्ध उपाध्ये यास त्याची शेतजमीन त्यांना विक्री कर म्हणून मागे लागले होते. दि:- 28/10/2017 रोजी सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास रेवणसिद्ध उपाध्ये हा त्याची बैलगाडी घेऊन शेतात पेरणी करण्यासाठी गेला होता. बैलगाडी सोडून पेरणीची अवजारे जोडीत असताना आरोपी शावरसिद्ध कुंभारे हा येऊन रेवणसिद्ध यास तू आम्हाला शेती का विकत नाही असे म्हणून त्याच्या हातातील खोऱ्याने डोकीत मारहाण केली, तसेच आमसिद्ध कुंभारे याने सत्तुरने तर गेनसिद्ध कुंभारे याने काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रेवनसिद्ध यास त्याचा मुलगा वैजनाथ याने उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यावरून रेवणसिद्ध याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा हा वळसंग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर गुन्ह्यात सरकारतर्फे एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात नेत्रसाक्षीदारांच्या जबाबाच्या पृष्ठ्यार्थ आलेला वैद्यकीय पुरावा हा सुसंगत नसल्याचा युक्तीवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.सतीश शेटे तर सरकारतर्फे ॲड. एम.एम. देशपांडे यांनी काम पाहिले.